
जीवाची बाजी लावून देशसेवा करणाऱ्या सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आपण काहीतरी देणे लागतो या संकल्पनेतून चिमुकल्यांनी खाऊचे पैसे साठवून सैनिक निधीत जमा केले. चिमुकल्यांनी गोळा केलेले ११ हजार १७० रुपये ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सैनिक कल्याण निधी कार्यालयात जमा करण्यात आले आहेत. चिमुकल्यांनी केलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी विशेष कौतुक केले.
भिवंडीच्या राहनाळ केंद्रांतर्गत असलेल्या कालवार जिल्हा परिषद शाळेतील पाचवीच्या विद्यार्थ्यांनी हा कौतुकास्पद उपक्रम राबवला. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच देशप्रेम जागरूक व्हावे यासाठी शिक्षक प्रशांत भोसले यांनी मुख्याध्यापिका अनिला काबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या परिपाठादरम्यान सैनिकांच्या बलिदानाचे धडे दिले. त्यात त्यांनी जवानांचे जीवन, त्यांचे त्याग, सीमेवरील संघर्षाची माहिती चित्रफीत व कथांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिली. देशसेवेसाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थ्यांनी खाऊचे पैसे गल्ल्यात जमा करण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांना पालक व ग्रामस्थांचा पाठिंबा मिळाला.
गणेश मंडळांमध्ये जाऊन सादरीकरण
गणेशोत्सवाच्या काळात शिक्षणाचा प्रसार व प्रचार व्हावा या उद्देशाने कालवार जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी मंडळांमध्ये जाऊन गवळण व साक्षरता गीतांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या या विशेष धडपडीने प्रभावित होऊन ग्रामस्थांनी आरतीच्या ताटात मोठ्या प्रमाणावर शुभेच्छारूपी दान दिले. ही संपूर्ण रक्कम विद्यार्थ्यांनी सैनिक निधीच्या गल्ल्यात जमा केली.




























































