
शिक्षणासाठी वसतिगृहात राहणाऱ्या रुम पार्टनर विद्यार्थिनीचा रूममध्ये कपडे बदलतानाचा फोटो व व्हिडिओ चित्रीकरण करून ते आपल्या मित्राला स्नॅपचॅटद्वारे पाठवल्याचा खळबळजनक प्रकार एमजीएम वसतिगृहात उघडकीस आला. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात व्हिडिओ काढणाऱ्या मुलीसह तिच्या मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
एम.जी.एम. कॉलेजमध्ये बायोमेडिकल अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारी विद्यार्थिनी याच महाविद्यालयाच्या वसतिगृहात समृद्धी शिवाजी जगदाळे (रा. वंजारवाडी, ता. भूम, जि. धाराशिव) हिच्यासोबत राहते. १९ जानेवारी रोजी सायंकाळी कॉलेज सुटल्यानंतर दोघीही वसतिगृहात गेल्या होत्या. त्यावेळी प्रेरणा ही आपल्या मित्रांसोबत फोनवर बोलताना ‘फोटो आणि व्हिडिओ कसे वाटले. हॉट आहेत का?’ असे बोलत असल्याचे विद्यार्थिनीच्या लक्षात आले. त्यामुळे तिला संशय आल्याने तिने रात्री १० वाजता समृद्धीकडे तिचा फोन मागितला. सुरुवातीला तिने नकार दिला. मात्र, नंतर फोन तपासल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.
समृद्धीने १८ जानेवारी रोजी तिच्या रूममध्ये रूमपार्टनर कपडे बदलत असताना फोटो व व्हिडिओ चित्रीकरण केले. हे चित्रीकरण समृद्धीने तिचा मित्र स्वराज धालगडे याला स्नॅपचॅटद्वारे पाठविले होते. हा प्रकार पाहिल्यानंतर तरुणीने समृद्धीला स्वराजला फोन लावण्यास सांगून स्वराजला या प्रकाराचा जाब विचारला. त्यावर समृद्धीनेच फोटो पाठविल्याचे कबूल केले.
या प्रकरणी समृद्धीने तरुणीची माफी मागितली. मात्र, हा प्रकार तिने तत्काळ समृद्धीच्या आई-वडिलांना सांगितला. दुसऱ्या दिवशी ते वसतिगृहात आल्यानंतर, त्यांच्यासमोरच समृद्धीने तिच्या रूमपार्टनरला धमकी दिली की, ‘जर पोलिसांत तक्रार दिली, तर मी आत्महत्या करेल आणि त्याला तू जबाबदार राहशील.’ या प्रकरणी तरुणीने सिडको पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोपान नरळे करीत आहेत.

























































