तेलंगणामध्ये अग्नितांडव! फर्निचरच्या गोदामाला भीषण आग, 5 कामगारांचा होरपळून मृत्यू

तेलंगणातील हैदराबाद जिल्ह्यात अग्नितांडव पाहायला मिळाला. हैदराबादमधील नामपल्ली येथे शनिवारी सायंकाळी फर्निचरच्या गोदामाला भीषण आग लागली होती. या आगीमध्ये होरपळून पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे. पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून गोदामाच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याी माहिती अग्निशमन विभागाचे महासंचालक विक्रम सिंह मान यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

नामपल्ली स्टेशन रोडवरील फर्निचर गोदामाला शनिवारी सायंकाळी आग लागली होती. गोदामामध्ये प्लायवूड, रेगझिम, फोम, केमिकल सोल्युशन यासह इतर गोष्टी असल्याने आग वेगाने पसरली. ही आग एवढी भीषण होती की आत अडकलेल्या कामगारांना बाहेरही पडता आले नाही. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पाहायला मिळाले. याची माहिती तात्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. रात्रभर चाललेल्या मोहिमेदरम्यान एका व्यक्तीला सुखरूप वाचवण्यात आले. मात्र पाच कामगार आतच अडकले होते. रविवारी त्यांचे मृतदेह हाती लागले.

याबाबत माहिती देताना अग्निशमन दलाचे महासंचालक मान म्हणाले की, आम्हाला पाच जण गोदामात अडकल्याची माहिती मिळाली होती. रविवारी सकाळी 9 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास पहिला मृतदेह सापडला आणि त्यानंतर एकामागोमाग पाचही मृतदेहही बाहेर काढण्यात आले. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी उस्मानीया रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

मृत व्यक्ती हे फर्निचरच्या गोदामामध्ये काम करणारे कामगार होते. इमारतीच्या तळघरात त्यांच्या राहण्याची सोय करून देण्यात आली होती. खरे म्हणजे हे तळघर फक्त वाहनांच्या पार्किंगसाठी होते, राहण्यासाठी नाही. मात्र तिथे कामगारांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गोदामाला आग लागल्याने कामगारांनी तळघरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र धूर आणि आगीच्या विळख्यात ते अडकले. एकमेकांना वाचवण्याच्या नादात पाच कामगारांचा मृत्यू झाला.

तळघरामध्ये मोठ्या प्रमाणात ज्वलनशील पदार्थ साठवून ठेवण्यात आलेले होते. त्यामुळे आग विझवण्यात आणि मृतदेह बाहेर काढण्यास बराच वेळ लागला. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आग विझवली आणि मृतदेह बाहेर काढले. या घटनेवर तेलंगणाचे मंत्री पोन्नम प्रभाकर यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी या घटनेची माहिती मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना दिली असून पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.