
प्रजासत्ताक दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व संपूर्ण मंदिर परिसरात आकर्षक व नयनरम्य विद्युत रोषणाई करण्यात आली असल्याची माहिती मंदिर समितीचे प्र. व्यवस्थापक संदेश भोसले यांनी दिली.
या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील श्री विठ्ठल सभा मंडप, मंदिराचा आतील व बाहेरील परिसर तसेच श्री संत नामदेव पायरी येथे तिरंग्याच्या रंगसंगतीत विशेष विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. याशिवाय श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, श्री संत तुकाराम भवन, श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास, वेदांता – व्हिडिओकॉन भक्त निवास आदी ठिकाणीही आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून परिसर देशभक्तीच्या वातावरणाने उजळून निघाला आहे.
सदर रोषणाईसाठी सुमारे 100 एलईडी माळा, 25 फोकस लाईट्स तसेच 100 ट्यूब लाईट्सचा वापर करण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात आली असून ही संपूर्ण रोषणाई श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमार्फत करण्यात आली आहे. या कामाची जबाबदारी विद्युत विभाग प्रमुख शंकर मदने यांच्याकडे असून यासाठी सात कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.
दरम्यान, प्रजासत्ताक दिन व सलग शासकीय सुट्ट्या आल्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. राज्याच्या विविध भागांतून तसेच परराज्यातूनही मोठ्या संख्येने भाविक श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दाखल झाले आहेत. भाविकांना सुरक्षित, सुलभ व सुव्यवस्थित दर्शन मिळावे, यासाठी मंदिर समितीमार्फत आवश्यक व पुरेशा प्रमाणात सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यामध्ये दर्शन रांगेचे नियोजनबद्ध व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छता, वैद्यकीय मदत तसेच इतर अनुषंगिक सुविधांचा समावेश आहे.
दर्शन रांग अधिक सुलभ व जलद गतीने
चालवण्यासाठी व्हीआयपी दर्शनावर निर्बंध घालण्यात आले असून टोकन दर्शन सुविधा तसेच भाविकांच्या हस्ते होणाऱ्या पूजा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे सामान्य भाविकांच्या दर्शनाला प्राधान्य देण्यात येत असून दर्शन प्रक्रिया अधिक गतिमान व सुरळीतपणे पार पडत असल्याचे यावेळी श्री भोसले यांनी सांगीतले.
























































