Padma Award 2026: छत्रपती शिवराय, महात्मा फुलेंचा अवमान करणाऱ्या माजी राज्यपाल कोश्यारींना पद्म पुरस्कार

केंद्र सरकारने २०२६ सालासाठीच्या ‘पद्म’ पुरस्कारांची घोषणा केली असून, यामध्ये महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंह कोश्यारी यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मात्र, त्यांच्या राज्यपालपदाच्या कार्यकाळातील काही विधानांमुळे हा पुरस्कार आता चर्चेचा आणि वादाचा विषय ठरत आहे.

भगतसिंह कोश्यारी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री, राज्यसभा आणि लोकसभा खासदार तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून प्रदीर्घ काळ सार्वजनिक जीवनात काम केले आहे. त्यांच्या याच प्रशासकीय आणि राजकीय अनुभवाची दखल घेऊन त्यांना देशातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाला आहे.

विधानांमुळे उद्भवलेला वाद

कोश्यारी यांना हा सन्मान जाहीर झाल्यानंतर त्यांच्या कार्यकाळातील जुन्या वादांना पुन्हा तोंड फुटले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल केलेली विधाने अत्यंत वादग्रस्त ठरली होती.

‘शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आदर्श आहेत’, या त्यांच्या विधानावरून महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती.

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विवाहाबद्दल केलेल्या टिप्पणीमुळेही त्यांच्यावर टीका झाली होती.

राजकीय प्रतिक्रियांची शक्यता

महाराष्ट्राच्या अस्मितेशी जोडल्या गेलेल्या महापुरुषांचा अवमान केल्याचा आरोप कोश्यारींवर सातत्याने झाला आहे. अशा परिस्थितीत त्यांना केंद्र सरकारने दिलेल्या या उच्च नागरी सन्मानामुळे राज्यातील विरोधी पक्षांकडून आणि शिवप्रेमी संघटनांकडून आक्षेप घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुरस्काराची घोषणा झाली असली तरी, यावरून पुढील काही दिवस राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.