
हिमाचल प्रदेशाती चंबा जिल्ह्यात एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. मुके प्राणी किती निष्ठावान असतात हे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. मालकाच्या मृत्यूनंतरही बर्फवृष्टी आणि कडाक्याच्या थंडीतही पाळीव कुत्र्याने त्याची साथ सोडली नाही. हिमाचल प्रदेशात फिरायला गेलेल्या मालकाचा बर्फात अडकून मृत्यू झाला. मालकाच्या मृत्यूनंतर चार दिवस त्याचा पाळीव पिटबुल मृतदेहाशेजारी रक्षण करत उभा होता.
विकसित राणा आणि पियुष नावाचे दोन तरुण भरमौरमधील भरमाणी मंदिराच्या परिसरात बेपत्ता झाले होते. चार दिवस त्यांचा शोध घेतल्यानंतर पियुषचा मृतदेह आढळून आला. बर्फात अडकून त्यांचा मृत्यू झाला होता. बचाव पथक आणि स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले, तेव्हा समोरचे दृश्य पाहून सर्वांना गहिवरून आले. पियुषचा मृतदेह बर्फाच्या थराखाली गाडला गेला होता, पण त्याच्या अगदी शेजारी त्याचा पाळीव कुत्रा बसला होता. चार दिवस उपाशीपोटी मालकाच्या शेजारी कुत्रा जंगली जनावरांपासूनही संरक्षण करत होता.
बचाव पथकाने मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता कुत्रा सुरुवातीला आक्रमक झाला. आपल्या मालकाला इजा करण्यासाठी हे लोक आले आहेत, असा त्याचा समज झाला. खूप प्रयत्नांनंतर हळूवार समजावल्यावर त्या कुत्र्याला अखेरीस समजले की ते मदतीसाठी आले आहेत. त्यानंतर तो बाजूला झाला आणि पथकाला त्यांचे काम करू दिले. कुत्र्याची आपल्या मालकाप्रती असलेली निष्ठा पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
























































