
जिल्हा परिषद निवडणुकीत विरोधकांचा टिकाव लागणार नाही. त्यामुळे वेळ आणि पैसा कशाला वाया घालवता? अर्ज मागे घ्या, असे वक्तव्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. याप्रकरणी पाटील यांच्यावर निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
सरकारमधील मंत्री जाहीर सभेतून विरोधी उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचे आवाहन करत असतील तर तो केवळ आचारसंहिता भंग नसून, निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करून प्रक्रिया प्रभावित करण्याचा गंभीर प्रकार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आयोगाला पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.





























































