
निलंग्यात भाजपच्या गुंडांनी काँग्रेसच्या तांबाळा गटातील उमेदवार अंजना सुनील चौधरी यांचे चक्क हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमातून शनिवारी अपहरण केले. मंगळवारी अंजना चौधरी या बाऊन्सर्सच्या गराडय़ात आल्या आणि उमेदवारी अर्ज मागे घेऊन परत गेल्या. या प्रकरणी काँग्रेसने पोलिसांकडे निवेदनही दिले होते, परंतु काहीही कारवाई करण्यात आली नाही.
लातूर जिल्हा परिषदेचा तांबाळा गट हा अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव आहे. या गटातून काँग्रेसने अंजना चौधरी यांना मैदानात उतरवले होते. आता या मैदानात भाजपच्या महानंदा तुमकुटे आणि पर्यायी भाजप उमेदवार मीरा तुबाकले या दोनच उमेदवार शिल्लक आहेत. विशेष म्हणजे, पर्यायी भाजप उमेदवारही सध्या ‘गायब’ असल्याचे समजते. ही निवडणूक बिनविरोध करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचे स्पष्ट होत आहे
हा महाराष्ट्र आहे की बिहार? –अमित देशमुख
दिवसाढवळ्या उमेदवाराचे अपहरण होते आणि दबावाखाली अर्ज मागे घेतला जातो हे पाहून हा महाराष्ट्र आहे की बिहार, असा प्रश्न पडतो. मतदानापूर्वीच इतकी गुंडशाही सुरू असेल तर आपण कुठे चाललो आहोत? ही लोकशाहीसाठी घातक बाब आहे, अशा शब्दांत माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी मदनसुरी येथील सभेत सत्ताधाऱ्यांवर कडाडून प्रहार केला.


























































