
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून थेट नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारी मेट्रो रेल्वे सेवा सुरू होणार आहे. 35 किमी लांबीचा सुमारे 22 हजार 862 कोटी रुपयांचा हा प्रकल्प साडेतीन वर्षांत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.
मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक मंत्रालयात आयोजित केली होती. या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी मेट्रो मार्गिका 8 च्या जोडणीस मान्यता देण्यात आली.
गडचिरोलीत खनिज वाहतुकीसाठी नवेगाव मोर ते सुरजागड या चार पदरी सिमेंट काँक्रिट महामार्गाच्या सुधारित आखणीस मान्यता देण्यात आली.
35 किलोमीटर अंतर, 20 स्थानके
मेट्रो मार्गाची एकूण लांबी 35 किलोमीटर, एकूण 20 स्थानके, 6 स्थानके भूमिगत, 14 स्थानके उन्नत.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 स्थानक ते घाटकोपर (पूर्व) पर्यंत भूमिगत स्थानके.
घाटकोपर (प) स्थानक ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनलपर्यंत दोन उन्नत स्थानके.
भूसंपादनासाठी 388 कोटी रुपयांचा खर्च.
समृद्धीच्या विस्तारित कामांना गती
नागपूर ते गोंदिया, भंडारा ते गडचिरोली या समृद्धी महामार्गाच्या विस्तारित कामांना गती देण्याचा निर्णय झाला. तीन वर्षांत पूर्ण करण्याची अट आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण न करणाऱया कंत्राटदाराला दंडाची व्यवस्था असलेली ‘ऑटो मोड’वरील यंत्रणा विकसित होणार आहे. भविष्यात सुरजागडपर्यंत गॅस वाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे.
प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण
पायाभूत सुविधा प्रकल्पाला आवश्यक असलेले भूसंपादन आणि सर्व प्रकारच्या परवानग्या प्राप्त करून घेण्याची कार्यवाही प्रकल्प सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावी, तसेच कुठलाही पायाभूत सुविधा प्रकल्प भूसंपादनानंतर पुढील तीन वर्षांत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
नाशिक शहर परिक्रमा मार्ग
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर परिक्रमा मार्ग होणार आहे. 66 किलोमीटर लांबीचा नाशिक शहर परिक्रमा मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून होईल. एकूण लांबी 66.15 किलोमीटर. या प्रकल्पासाठी एकूण 3 हजार 954 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.
Mumbai Metro 8 Approved: Direct Link Between Mumbai & Navi Mumbai Airports
CM Devendra Fadnavis approves Metro Line 8 to connect Mumbai and Navi Mumbai airports. Projects like Nashik City Ring Road & Samruddhi Expressway extension also cleared.




























































