
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात दुःखद निधन झालं. मुंबईहून बारामतीकडे येणाऱ्या खासगी चार्टर विमानाच्या लँडिंगदरम्यान अपघात झाला. ज्यात अजित पवारांसह विमानातील पाचही जणांचा मृत्यू झाला. हा अपघात झालेल्या वेळी ते जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीत जात होते. राज्य सरकारने तीन दिवसांचा राजकीय शोक जाहीर केला असून, उद्या (२९ जानेवारी) बारामतीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी देवळाली प्रवरा (अहिल्यानगर ) येथे झाला. त्यांनी त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण देवळाली प्रवरा येथे पूर्ण केले. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी स्वीकारल्याने महाविद्यालयीन शिक्षण त्यांचं अपूर्ण राहिलं. तरीही त्यांनी सहकारी क्षेत्रातून राजकीय कारकीर्द सुरू केली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मजबूत पकड निर्माण केली.
सहकारी क्षेत्रातील सुरुवात आणि राजकीय प्रवेश
अजित पवार १९८२ मध्ये पुण्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळावर निवडून आले. १९९१ मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले. त्याच वर्षी बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले, पण लगेच राजीनामा देऊन बारामती विधानसभा मतदारसंघातून उपनिवडणुकीत पहिल्यांदा आमदार झाले.
बारामतीचे दीर्घकालीन प्रतिनिधित्व
अजित पवार यांनी १९९१ पासून २०२४ पर्यंत बारामती मतदारसंघातून एकूण आठ वेळा आमदारकी जिंकली. तब्बल ३० वर्षांहून अधिक काळ बारामतीचे प्रतिनिधित्व करताना प्रत्येक निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. बारामतीला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
मंत्रिपदे आणि उपमुख्यमंत्रीपदाची कारकीर्द
- १९९१-१९९२ : कृषी आणि विद्युत राज्यमंत्री (काँग्रेस सरकार)
- १९९२-१९९५ : मृदा संवर्धन, विद्युत आणि नियोजन राज्यमंत्री (काँग्रेस सरकार)
- १९९९-२००४ : जलसिंचन – कृष्णा खोरे आणि कोकण सिंचन कॅबिनेट मंत्री (काँग्रेस-एनसीपी सरकार)
- २००४-२००९ : जलसंपदा कॅबिनेट मंत्री (काँग्रेस-एनसीपी सरकार)
- २००९-२०१० : उपमुख्यमंत्री, कृषी, ग्रामविकास, नियोजन इत्यादी विभाग
- २०१०-२०१४ : उपमुख्यमंत्री आणि अर्थ, नियोजन, ऊर्जा विभाग
- २०१९-२०२२ : उपमुख्यमंत्री (महाविकास आघाडी सरकार)
- २०२२-२०२३ : उपमुख्यमंत्री आणि अर्थ, नियोजन विभाग (भाजप-शिंदे गट-राष्ट्रवादी अजित गट)
- २०२४-२०२६ : उपमुख्यमंत्री आणि अर्थ, नियोजन, उत्पादन शुल्क विभाग (भाजप-शिंदे गट-राष्ट्रवादी अजित गट)
महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांना ‘दादा’ म्हणून ओळखले जायचे. ते ग्रामीण भागातील जनतेशी थेट जोडले गेले होते आणि विकास कामांसाठी ओळखले जात होते. सहकारी क्षेत्र, सिंचन, अर्थ आणि नियोजन विभागात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कुटुंबीय, कार्यकर्ते आणि चाहत्यांना हा मोठा धक्का आहे. दरम्यान, अजित पवार यांचं पार्थिव विद्या प्रतिष्ठान येथे ठेवण्यात आलं आहे. तर उद्या सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार आहे. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.



























































