
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आल्याने राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे मतदान पुढे ढकलले आहे. आता सुधारित कार्यक्रमानुसार राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारीऐवजी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होईल, तर मतमोजणी 7 फेब्रुवारीऐवजी 9 फेब्रुवारीला होईल. राज्य निवडणूक आयोगाने आज घोषणा केली.
अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. दुखवटय़ामुळे प्रचार करता न आल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे मतदान पुढे ढकलण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने मतदान आणि मतमोजणी दोन दिवसांनी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2026 च्या पुढे फक्त दोन आठवडय़ांची मुदतवाढ दिली आहे; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारीला अपघाती निधन झाल्यामुळे राज्य सरकारने राज्यात 28 जानेवारी ते 30 जानेवारीपर्यंत दुखवटा जाहीर केला आहे. या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल केले आहेत.
9 फेब्रुवारीला मतमोजणी
संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना 31 जानेवारी रोजी प्रसिद्ध करतील. आता 7 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल. त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती 5 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता होईल. संबंधित ठिकाणी 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात 11 फेब्रुवारी पर्यंत प्रसिद्ध केली जातील, अशी माहिती आयोगाने दिली आहे.




























































