
हिंदुस्थानने अखेरच्या पाचव्या सामन्यात न्यूझीलंडला ४६ धावांनी धूळ चारून द्विपक्षीय टी-२० क्रिकेट मालिकेत ४-१ फरकाने बाजी मारली. ईशान किशानचे (१०३) शतकी धुमशान, कर्णधार सूर्यकुमार यादवचे (६३) आक्रमक अर्धशतक आणि हार्दिक पंड्याची ४२ धावांच्या वादळी खेळीनंतर अर्शदीप सिंगचे ५ बळी ही हिंदुस्थानच्या विजयाची वैशिष्ट्ये ठरली. शतकवीर ईशान किशन या सामन्याचा मानकरी ठरला, तर मालिकावीरची माळ कर्णधार सूर्यकुमार यादवच्या गळ्यात पडली.
हिंदुस्थानकडून मिळालेल्या २७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव १९.४ षटकांत २२५ धावांवर संपुष्टात आला. त्यांच्याकडून फिन एलनने ३८ चेंडूत ८ चौकार व ६ षटकारांसह ८० धावांची खेळी करीत सामन्यात रंगत निर्माण केली होती. मात्र, दुसऱ्या बाजूने त्याला साथ मिळाली नाही. रचिन रवींद्र (३०), डॅरिल मिचेल (२६) व ईश सोढी (३३) यांनीही दिलेली लढत अपुरी ठरली. हिंदुस्थानकडून वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने सर्वाधिक ५ बळी टिपले, तर अक्षर पटेलने ३ फलंदाज बाद केले. वरून चक्रवर्ती व रिंकू सिंग यांनाही १-१ बळी मिळाला.
त्याआधी, नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या हिंदुस्थानने ५ बाद २७१ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. यात ईशान किशनने अवघ्या ४३ चेंडूंमध्ये ६ चौकार आणि १० षटकारांचा घणाघात केला. कर्णधार सूर्यकुमार यादवनेही आपली फॉर्म कायम राखत ३० चेंडूंमध्ये ६३ धावा ठोकल्या. या खेळीत ४ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. हार्दिक पंड्यानेदेखील १७ चेंडूंमध्ये ४२ धावांची आक्रमक खेळी करत धावगतीला वेग दिला. मात्र, संजू सॅमसन पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि केवळ ६ धावांवर बाद झाला. रिंकू सिंग ८, तर शिवम दुबे ७ धावांवर नाबाद राहिले. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसनने २, तर जेकोब डफी, काईल जेमिसन व कर्णधार मिचेल सॅण्टनर यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.























































