
जुहू येथील दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या शेट्टी टॉवरवर गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी पुण्यातील चौघांना बेडय़ा ठोकल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात गोळीबार करणारा शुटर तसेच बिष्णोई गँगशी संबंधित असलेला वॉण्टेड शुभम लोणकर अशा दोघांचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. पोलीस त्यांचा शोध घेत असून गुह्यातील आरोपी सिग्नल या ऍपच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्कात होते, असे सूत्रांकडून समजते.
रोहित शेट्टी यांच्या शेट्टी टॉवरच्या पहिल्या मजल्यावर शनिवारी रात्री उशिरा एका अज्ञात व्यक्तीने पाच गोळ्या फायर करून पळ काढला होता. याप्रकरणी जुहू पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर जुहू पोलिसांबरोबर गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. पुणे पोलिसांच्या मदतीने स्वप्नील सकट (23), समर्थ पोमाजी (19), सिद्धार्थ येनुपरे (19) आणि आदित्य गायकी (19) अशा चौघांना अटक करून मुंबईत आणले. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आळीपाळीने शेट्टी टॉवरची रेकी
आरोपींनी आळीपाळीने रोहित शेट्टी यांच्या शेट्टी टॉवरची रेकी केल्याचे समजते. तसेच अटक व फरार आरोपी सिग्नल
ऍपच्या माध्यमातून ऐकमेकांच्या संपर्कात होते. अटक आरोपींना आर्थिक रसद देखील पुरविण्यात आल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते.






























































