मुंबई विमानतळावर एअर इंडिया आणि इंडिगो विमानाचे पंख एकमेकांना घासले, मोठा अपघात टळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. धावपट्टीवर टॅक्सींग दरम्यान एअर इंडिया आणि इंडिगो या दोन कंपन्यांच्या विमानांचे पंख एकमेकांना घासले. सुदैवाने यात कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही आणि दोन्ही विमानांमधील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे विमान (फ्लाइट AI 2732) मुंबईहून कोईम्बतूरला जाण्यासाठी उड्डाणाच्या तयारीत होते आणि पुशबॅक प्रक्रियेत होते. त्याच वेळी हैदराबादहून मुंबईला आलेले इंडिगोचे विमान (फ्लाइट 6E 791) लँडिंगनंतर पार्किंगच्या दिशेने टॅक्सींग करत होते. या दरम्यान दोन्ही विमानांचे पंखा एकमेकांना घासले.

या धडकेमुळे एअर इंडियाच्या विमानाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हे विमान तपासासाठी ग्राऊंड करण्यात आले असून, सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात आले. एअर इंडियाने प्रवाशांच्या पुढील प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था केली आहे. याच याबाबत माहिती देताना इंडिगोने आपल्या निवेदनात स्पष्ट केले की, विमानाचे पंख दुसऱ्या विमानाला घासले असले तरी सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. विमान पार्किंगमध्ये नेल्यानंतर प्रवाशांना सुखरूप उतरवण्यात आले.