
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर फडणवीसांना बोलण्याचा अधिकार नाही असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. तसेच अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू होती असेही शरद पवार म्हणाले.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत अजित पवार यांनी आपल्याला सांगितलं असतं असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, “या संपूर्ण चर्चेत फडणवीस कुठेही नव्हते. त्यामुळे त्यांनी माझं नाव घ्यायचा काय संबंध आहे, याबाबत भाष्य करण्याचा त्यांना काही अधिकार आहे, असं मला वाटत नाही,” असे शरद पवार म्हणाले
तसेच, अजित पवार आणि जयंत पाटील हे विलीनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा करत होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत विचारलेल्या प्रश्नावर शरद पवार यांनी भाष्य टाळले. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या याबाबत प्रतिक्रिया देताना त्यांनी, “त्या उपमुख्यमंत्री झाल्या म्हणून मी त्यांना आनंदाने आशीर्वाद देईन,” असेही सांगितले.
दरम्यान, संसदीय कामकाजावर बोलताना पवार म्हणाले की, “माझ्या राजकीय कारकिर्दीत गेली 58 वर्षे मी विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभेचा सदस्य राहिलो आहे. या 58 वर्षांत संसदेत माझी कधीही गैरहजेरी राहिलेली नाही. यंदाच्या अर्थसंकल्पातून ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा होती.”
भारत–अमेरिका व्यापार कराराबाबत बोलताना पवार म्हणाले की, “पुढील दोन दिवसांत भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी कराराबाबत चित्र स्पष्ट होईल, अशी अपेक्षा आहे. अमेरिकेने काही समाधानकारक निर्णय घेतले असून, भारतावरील टॅरिफ कमी केले आहेत. मात्र अमेरिका हा शक्तिशाली देश आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणावर निर्यात सुरू केल्यास त्याचा परिणाम आपल्या शेतीवर होण्याची शक्यता आहे. हा मुद्दा काळजीचा आहे” असेही शरद पवार यावेळी म्हणाले.





























































