किश्तवाडमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक; एका दहशतवाद्याचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात सुरक्षा दलांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे. जम्मूतील किश्तवाड जिल्ह्यात बुधवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे. लष्कराने जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्याला ठार केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किश्तवाड जिल्ह्यातील छत्रू भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे लष्कर आणि पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली असता दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सध्या या परिसरात दोन्ही बाजूंनी चकमक सुरू आहे. दहशतवादी पळून जाऊ नयेत म्हणून लष्कराने प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलं असून येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांचीही कडक तपासणी केली जात आहे.

दरम्यान, किश्तवाडमधील या चकमकीपूर्वी आजच उधमपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. उधमपूरमधील बसंतगड येथील एका गुहेत लपलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना लष्करानं चकमकीत ठार केलं. या कारवाईत लष्कर, पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने सहभाग घेतला होता.