
राज्याची आर्थिक स्थिती खालावली असल्यामुळे वित्त विभागाने मंत्री आणि अधिकाऱयांच्या परदेश दौऱयावर निर्बंध घातले असताना फिल्म फेस्टिव्हलच्या अभ्यासासाठी सांस्कृतिक कार्य विभागाची ‘टूर’ जर्मनीच्या दौऱ्यावर निघाली आहे.
सांस्कृतिक कार्य विभागाकडून याच महिन्यात हा जर्मनी दौरा आयोजित करण्यात आला आहे. फिल्मसिटी, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचा 13 प्रतिनिधींचा अभ्यास गट या दौयात सहभागी होणार आहे. बर्लिन फिल्म फेस्टिवलच्या अभ्यासासाठी हा दौरा आहे. कान्समध्ये जागतिक चित्रपट महोत्सव असतो. त्यात मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी आपला सहभाग असतो त्याच धर्तीवर बर्लिन फिल्म फेस्टिव्हलला आपले प्रतिनिधी जात आहेत, असे फिल्म सिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी सांगितले.
अभ्यास की पर्यटन?
अभ्यासगट नेमताना त्यातले लोक नक्की काय आहेत? या अभ्यास गटातले लोक नक्की कोण आहेत? त्याचं मराठी चित्रपट क्षेत्रात योगदान काय? या अभ्यास गटातून मराठी सिनेमा क्षेत्राला नक्की काय फायदा होणार आहे, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. अभ्यास गटाच्या नावाखाली टुरिझमचा विकास होतोय! राज्यावर हजारो कोटींचे कर्ज असताना ही लाखोंची उधळपट्टी का, ही चैन कशी परवडणार, अशा प्रतिक्रिया समाजमाध्यमांत उमटत आहेत.
युनेस्कोकडून प्रमाणपत्र स्वीकारणार
छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा गड किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाले आहे. युनेस्कोकडून त्याचे प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार व खात्याचे सचिव किरण कुलकर्णी हे याच महिन्यात पॅरिसला जाणार आहेत. पुरातत्व विभागाने हा दौरा प्रस्तावित केला आहे.































































