ICC T20 WC 2026 – डिव्हिलियर्सने निवडले ‘टॉप-4’ संघ; बलाढ्य ऑस्ट्रेलियाला डच्चू!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येत्या 7 फेब्रुवारीपासून हिंदुस्थान आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 चा बिगुल वाजणार आहे. क्रिकेटच्या या महाकुंभापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज आणि ‘मिस्टर 360’ एबी डिव्हिलियर्सने उपांत्य फेरीत कोणते चार संघ पोहोचतील याबाबत भविष्यवाणी केली आहे. विशेष म्हणजे, डिव्हिलियर्सने आपल्या यादीतून ऑस्ट्रेलियाला बाहेर ठेवून सर्वांनाच चकित केले आहे.

डिव्हिलियर्सने आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना हिंदुस्थान, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि न्यूझीलंड या चार संघांना उपांत्य फेरीचे प्रबळ दावेदार मानले आहे. हिंदुस्थानचा संघ घरच्या मैदानावर खेळणार आहे. त्यामुळे टीम इंडिया हा स्पर्धेतील सर्वात धोकादायक संघ असल्याचे त्याने म्हटले आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेचा संघ गेल्या वेळचा उपविजेता असून यंदा जेतेपदासाठी सज्ज असल्याचे मत त्याने व्यक्त केले.

इंग्लंडचा संघ दोन वेळचा चॅम्पियन आहे. त्यामुळे हा संघ पुन्हा एकदा मुसंडी मारू शकतो, असेही डिव्हिलियर्सने स्पष्ट केले. यासह सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या किवी संघाला डिव्हिलियर्सने चौथी पसंती दिली आहे. मात्र त्याने कांगारूंकडे दुर्लक्ष केले आहे. 2021 चा विश्वविजेता आणि नेहमीच मोठ्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला डिव्हिलियर्सने आपल्या टॉप-4 मध्ये स्थान दिलेले नाही. त्याच्या या निर्णयाने क्रिकेट वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

हिंदुस्थान हा सर्वात प्रबळ संघ आहे. त्यांच्याकडे दर्जेदार फिरकीपटू आणि जबरदस्त खोलवर फलंदाजी आहे. घरच्या मैदानावर खेळण्याचा दबाव असेल, तरीही त्यांना हरवणे इतर संघांसाठी जवळपास अशक्य आहे, असे एबी डिव्हिलियर्स म्हणाला.

क्रिकेटच्या नियमपुस्तकात 73 मोठे बदल, कसोटी क्रिकेटमध्ये वाढणार थरार; विजयानंतरचे गैरवर्तनही निकाल बदलणार

टीम इंडियाची दमदार तयारी

दरम्यान, हिंदुस्थानचा संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. गेल्या 24 टी-20 सामन्यांपैकी 20 सामन्यांत टीम इंडियाने विजय मिळवला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील या संघात सध्याच्या घडीचा नंबर 1 फलंदाज अभिषेक शर्मा आणि नंबर 1 गोलंदाज वरुण चक्रवर्ती यांचा समावेश आहे. हिंदुस्थानचा पहिला सामना 7 फेब्रुवारीला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर अमेरिकेविरुद्ध रंगणार आहे. तत्पूर्वी नवी मुंबईतील डी.वाय. पाटील मैदानावर झालेल्या सराव लढतीत हिंदुस्थानने आफ्रिकेचा 30 धावांनी पराभव केला. हिंदुस्थानने 20 षटकात 240 धावा केल्या. त्यानंतर आफ्रिकेला 210 धावांमध्ये रोखत सलग दुसऱ्या विजेतेपदासाठी तयार असल्याचे दाखवून दिले.

ICC T20 World Cup – टी-20 वर्ल्डकपमध्ये ‘ओल्ड इज गोल्ड’; चाळीशी पार केलेले ‘हे’ खेळाडू तरुणांना देणार आव्हान!