
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आणि राजकीय नेते विजय यांना मद्रास उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. २०१५-१६ या आर्थिक वर्षात १५ कोटी रुपयांचे उत्पन्न लपवल्याच्या आरोपावरून प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) ठोठावलेला १.५ कोटी रुपयांचा दंड न्यायालयाने कायम ठेवला आहे. विजय यांनी या दंडाविरोधात केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
न्यायमूर्ती सेंथिलकुमार राममूर्ती यांनी शुक्रवारी हा निकाल दिला. प्राप्तिकर विभागाने बजावलेली नोटीस ही ‘प्राप्तिकर कायदा कलम २६३’ अंतर्गत विहित कालमर्यादेतच होती, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. या प्रक्रियेत कोणतीही त्रुटी नसल्याचे सांगत न्यायालयाने विजय यांची याचिका फेटाळून लावली. मात्र, या दंडाला इतर तांत्रिक कारणास्तव आव्हान देण्यासाठी विजय यांना ‘प्राप्तिकर अपीलीय न्यायाधिकरणाकडे’ (ITAT) दाद मागण्याची मुभा देण्यात आली आहे.
हे प्रकरण २०१५ मधील आहे. सप्टेंबर २०१५ मध्ये विजय यांच्या निवासस्थानी प्राप्तिकर विभागाने छापे टाकले होते. तपासादरम्यान १५ कोटी रुपयांचे अघोषित उत्पन्न समोर आले होते. त्यानंतर २०१८ मध्ये दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. विजय यांनी या कारवाईला आव्हान दिले होते, ज्यावर न्यायालयाने आता अंतिम शिक्कामोर्तब केले आहे.
याआधी एका अंतरिम खंडपीठाने या दंडाच्या वसुलीला स्थगिती दिली होती, कारण ही नोटीस कालमर्यादा संपल्यानंतर बजावण्यात आली असावी, असे प्रथमदर्शनी वाटले होते. मात्र, सविस्तर सुनावणीअंती ही नोटीस कायदेशीर चौकटीत आणि वेळेतच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता प्राप्तिकर विभागाला या दंडाची वसुली करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
madras high court upholds rs 1.5 crore tax penalty on actor thalapathy vijay
the madras high court dismissed south superstar vijay’s plea and upheld the rs 1.5 crore penalty imposed by the it department for undisclosed income.


























































