
कोकणवासीयांना गावी जाण्यासाठी सोयीस्कर ठरणार मांडवी एक्प्रेस दररोज 3 ते 4 तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून नाहक मनस्तापही सहन करावा लागत आहे. हा त्रास आता सहन करण्यापलीकडे गेला आहे. त्यामुळे आम्हाला फक्त वेळेवर चालणारी ट्रेन उपलब्ध करून द्या, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
पनवेलजवळ घेतलेल्या ब्लॉकमुळे कोकण रेल्वे मार्गावरील मेल-एक्सप्रेसचा खोळंबा होत असल्याचे सांगितले जात आहे. तुतारी एक्सप्रेस, कोकणकन्या एक्सप्रेस, मत्स्यगंधा एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस या प्रमुख गाडय़ांच्या वेळापत्रकाला ब्लॉकचा फटका बसला आहे. मात्र मांडवी रोजच उशिराने धावत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे कोकणवासीयांसाठी वेळेवर धावणारी ट्रेन सुरू करणे, गरजेचे असल्याचे प्रवासी दिली सावंत यांनी सांगितले.




























































