कर्नाटकची सामन्यावर पकड, मुंबईचा 120 धावांत खुर्दा; कर्नाटक 2 बाद 110

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रणजी करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत कर्नाटकने पहिल्याच दिवशी मुंबईला चांगलाच हादरा दिला. प्रसिध कृष्णा, विद्वथ कावेरप्पा आणि श्रेयस गोपाल यांच्या भेदक माऱयाने मुंबईचा डाव अक्षरशः 120 धावांत कोसळला, तर मयंक अगरवालच्या नाबाद अर्धशतकाने कर्नाटकने पहिल्या दिवसअखेर 2 बाद 110 अशी मजल मारत सामन्यावर आपली घट्ट पकड केली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा मुंबईचा निर्णय पूर्णपणे फसला. कर्नाटकच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच शिस्तबद्ध आणि आक्रमक मारा करत मुंबईला सावरण्याची संधीच दिली नाही. प्रसिध कृष्णाने 21 धावांत तीन, कावेरप्पाने 38 धावांत तीन, तर श्रेयस गोपालने केवळ चार धावांत तीन बळी घेत मुंबईचा डाव 48.1 षटकांत 120 धावांत गुंडाळला.

मुंबईकडून अखिल हेरवाडकरने एकाकी झुंज देत 138 चेंडूंत 60 धावा केल्या. मात्र दुसऱया टोकाकडून साथ न मिळाल्याने मुंबईने 50 धावांतच सात गडी गमावले. यशस्वी जैस्वाल, मुशीर खान आणि सिद्धेश लाड स्वस्तात बाद झाले. मग कर्नाटकने आक्रमक सुरुवात केली. लोकेश राहुल आणि मयंक अगरवाल यांनी पहिल्या पाच षटकांत 33 धावा काढल्या. दिवसअखेर कर्नाटकने दोन बाद 110 धावा केल्या असून मयंक अगरवाल 54 धावांवर नाबाद आहे. कर्नाटक आता केवळ 10 धावांनी मागे असून आठ विकेट राखून आहे.