देखणे न देखणे – निसर्ग: आतला-बाहेरचा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>डॉ. मीनाक्षी पाटील

निसर्ग हा जसा माणसाबाहेर आहे तसाच तो माणसाच्या आतही आहे. त्यामुळे बाहेरच्या निसर्गातल्या सौंदर्यामध्ये जशी हेतुरहित हेतुपूर्णत पाहायला मिळते तशीच हेतुरहित सौंदर्यनिर्मिती कलावंताच्या मनातील निसर्ग-प्रतिभेने निर्माण केलेल्या कलाकृतीत पाहायला मिळते.

या लेखमालेतून आपण विविध कलांमधून व्यक्त होणाऱया जड-चैतन्याचा, दृश्य-अदृश्याचा विविधांगाने शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. हा शोध घेताना आपला प्रतिपाद्य विषय उलगडण्याच्या ओघात अनेक संज्ञा-संकल्पना, विचारव्यूह यांच्या माध्यमातून या विषयाच्या विविध कंगोऱयांना आपण स्पर्श करणार आहोत. भारतीय तसेच पाश्चिमात्य विचारपरंपरांमध्ये विविध कलांच्या निर्मिती आणि आस्वाद प्रेरणा- प्रक्रिया यांविषयी सातत्याने अभ्यास होत आहे. या अभ्यासातून कलानिर्मिती व कलानुभवामध्ये मानवी जाणीव अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते हे स्पष्ट झाले आहे.

कोणताही कलावंत हा निसर्गाचा एक घटक म्हणून निसर्गात घडणाऱया घटना- घडामोडींचे अवलोकन करीत असतो. निसर्गात निरंतर काहीतरी घडत असते. त्या घडणाऱया गोष्टींचे संवेदनशील अशा कलावंत मनावर कळत नकळत परिणाम होत असतात आणि बऱयाचदा त्याचा आविष्कार कलाकृतीतून घडताना दिसतो. या अर्थाने निसर्गात स्वाभाविक अशा गोष्टी ‘घडतात’ तर कलेमध्ये जाणीवपूर्वक, ‘घडवलेली’ निर्मिती असते. अर्थात निसर्गातील सौंदर्यमागील हेतू किंवा साध्य याचा विचार करताना आपल्या असे लक्षात येते की, हे सौंदर्य निसर्गातील विविध घटकांतून सहजतेने उलगडलेले असते. अशाच प्रकारची ‘सहजता’ उत्स्फूर्तपणे कलेमध्ये अनुभवायला येत असते.

निसर्गनिर्मित गोष्टींमधून मिळणाऱया सौंदर्यानुभवात एक हेतूरहित हेतूपूर्णता जाणवत असते. आपल्या कलाकृतीत अशीच हेतूरहित हेतूपूर्णता किंवा सहजता, उस्फूर्तता कलेत आणण्यासाठी कलावंत धडपडत असतो. या धडपडीचा तो रियाझ करत असतो. एका बाजूला निसर्गातील सुंदर गोष्टी आपोआप ‘घडतात’ असे दिसते तर कलावंत मात्र आपल्या स्वतंत्र इच्छाशक्तीच्या सहाय्याने कलाकृती ‘घडवत’ असतो, परंतु हे घडवण्यात जितक्या अधिक प्रमाणात उस्फूर्तता, सहजता असेल तितका रसिकांना त्याच्या कलाकृतीत हेतूशून्य हेतूपूर्णतेचा सुंदर अनुभव मिळतो. विविध कलांच्या संदर्भात पाहिले तर असे दिसते की, ललितकलेच्या रचनेचे नियम, सौंदर्याची एकके स्वतंत्रपणे त्या त्या क्षेत्रातून विकसित होत आली आहेत.
कलावंत आपल्या बुद्धीचा स्वतंत्रपणे वापर करून एखादी संकल्पना मनात विकसित करून जाणीवपूर्वक कलाकृती ‘घडवतो.’ थोडक्यात कलाकृती ही जाणीवपूर्वक घडवलेली कृती असते. कलावंत आपल्या इच्छाशक्ती व बुद्धीच्या सहाय्याने विशिष्ट नियमांच्या, संकेतांच्या आधारावर कलाकृती ‘घडवत’ असतो. कलावंत एखादी कलाकृती घडवतो म्हणजे आपल्याला काय घडवायचे आहे याची स्पष्ट कल्पना त्याच्या मनात असते आणि त्यानुसार तो आपल्या क्रियांचे नियमन करतो. त्या त्या कलेसाठी जे जे माध्यम वापरले जाते त्या माध्यमातून सौंदर्याकारासाठी कलावंताकडून विशुद्ध संवेदनांची आकारिक तत्त्वानुसार संघटना केली जाते.

प्रत्येक कलाप्रकाराची रचनातत्त्वे ही वेगवेगळी आणि स्वतंत्र असतात. अर्थात कोणत्याही माध्यमाकडे कलावंत केवळ साधन म्हणून पाहत नाही, तर त्या माध्यमातून निर्माण होणाऱया आविष्काराकडे तो तटस्थपणे पाहतो.निसर्गातील सौंदर्यातून ज्या सहजतेचा प्रत्यय येतो तशाच सहजतेचा प्रत्यय आपल्या कलाकृतीतून यावा यासाठी कलावंताची धडपड असते. याचा अर्थ कलानिर्मितीच्या वेळी कलावंत मनात काहीएक हेतू, संकल्पना इत्यादी गोष्टी सूक्ष्म स्तरावर कार्यरत असतातच, फक्त त्याच्या अखंड कलासाधनेमुळे त्यात आलेल्या उत्स्फूर्ततेमुळे कलाकृतीचं ‘घडवलेपण’ लपले जाते. थोडक्यात ललित कलाकृतींची रचना हेतुपूर्ण असली तरी ती कोणत्याही अंतर्गत किंवा बाह्य हेतूंशी निगडीत नसते. पाककृती करणारी गृहिणी त्यासाठी लागणाऱया पदार्थांकडे केवळ आवश्यक साधनसामुग्री म्हणून पाहते, परंतु कलावंत मात्र आपल्या माध्यमाकडे केवळ साधन म्हणून पाहत नाही. कोणत्याही लौकिक वस्तूच्या प्राप्तीसाठी म्हणून लागणारे जडद्रव्य म्हणून तो त्या माध्यमाचा वापर करत नाही तर त्या माध्यमाकडे किंवा त्या माध्यमातून निर्माण होणाऱया सौंदर्याविष्काराकडे तो एका ताटस्थ्याने पाहतो व त्यामुळेच तो आविष्कार हेतुशून्य भासतो.

थोडक्यात कलावंत जरी जाणीवपूर्वक कलाकृती घडवत असला तरी कळीचं जसं सहज फुलात रूपांतर होतं तशीच त्याची कलाकृती सहजतेने निर्माण होते असे भासणे महत्त्वाचे असते. निसर्ग हा जसा माणसाबाहेर आहे तसाच तो माणसाच्या आतही आहे. त्यामुळे बाहेरच्या निसर्गातल्या सौंदर्यामध्ये जशी हेतुरहित हेतुपूर्णता पाहायला मिळते तशीच हेतुरहित सौंदर्यनिर्मिती कलावंताच्या मनातील निसर्ग-प्रतिभेने निर्माण केलेल्या कलाकृतीत पाहायला मिळते. मानवी मनशक्तींमध्ये जे परस्पर-सामंजस्य असते त्यायोगे कलावंताच्या मनातील निसर्ग ललित कलेसाठी लागणारे नियम अगदी उत्स्फूर्तपणे निर्माण करतो. त्यामुळे प्रतिभा आपल्या निर्मिती प्रक्रियेविषयी निश्चित अशा शास्त्रशुद्ध भाषेत काहीच सांगू शकत नाही. प्रतिभा म्हणजे कलावंताच्या मनातील नियमरहित नियमितता निर्माण करणारा निसर्गच असल्यामुळे प्रतिभेकडून असे निश्चित निर्मितीनियम मिळणे शक्य होत नाही.

या दृष्टीने पाहिल्यास एक गोष्ट लक्षात येते की कोणतीही कलाकृती ही अनिश्चित स्वरूपाचे अनेक अर्थ प्रसवणारी अशी आकृती असते. त्यामुळेच कलाकृती व आस्वादक यांच्यातील सहसर्जक अशा परस्परसंवादांतून कलाकृतीच्या अर्थाला धुमारे फुटत असतात.
(लेखिका साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव, कवयित्री, चित्रकार आहेत.)
[email protected]