
मुंबईजवळील समुद्रात आंतरराष्ट्रीय तेल तस्करी करणाऱया जहाजांवर भारतीय तटरक्षक दलाने धडक कारवाई करून जहाजे जप्त केली आहेत. जप्त केलेल्या या तिन्ही जहाजांमध्ये मोठ्या प्रमाणात तेल साठा होता. या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय तेल तस्करी रॅकेटचा पर्दाफाशच झाला आहे. समुद्रात सुमारे 100 नॉटिकल मैलांवर पश्चिम दिशेला आलेल्या या अवाढव्य जहाजांबाबत संशय आल्याने केलेल्या चौकशीतून हा धक्कादायक प्रकार समोर आला.
डिजिटल तपासामुळे तस्करीची पोलखोल
तटरक्षक दलाच्या टेक-इन्क्लुसिव्ह सिस्टीमने एका तपासणीत एका मोटर टँकरचा शोध घेतला. या टँकरच्या हालचाली संशयास्पद असल्याचे यावेळी निदर्शनास आले. त्यामुळे जहाजाच्या हालचालींचा डिजिटल तपास सुरू करण्यात आला. यामध्ये नजीकच्या जहाजांचाही डेटा पॅटर्न तपासण्यात आला.
जहाजांचे मालक परदेशी
जप्त करण्यात आलेली जहाजे कारवाई टाळण्यासाठी वारंवार ओळख बदलत असल्याचे तटरक्षक दलाच्या डिजिटल तपासात समोर आले आहे. शिवाय या जहाजांचे मालक हे परदेशी असल्याचेही चौकशीतून समोर आले आहे. दरम्यान, तस्करी करणारी ही जहाजे मुंबईत आणली जाणार असून पुढील तपास भारतीय सीमा शुल्क विभागाकडून केला जाणार आहे.


























































