“दोन दिवसांपूर्वीच हैदराबादमध्ये बिर्याणी खात होता अन् अचानक…”; मोहम्मद सिराजबाबत CSK च्या माजी खेळाडूची मजेशीर टिप्पणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ICC T-20 World Cup 2026 च्या आपल्या पहिल्याच सामन्यात हिंदुस्थानने अमेरिकेचा २९ धावांनी पराभव करून स्पर्धेची दणक्यात सुरुवात केली. या विजयात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी मोलाची भूमिका बजावली. मात्र, या सामन्यानंतर माजी हिंदुस्थानी खेळाडू आणि ‘सीएसके’चा माजी स्टार बॅटर सुब्रमण्यम बद्रीनाथ याने सिराजबाबत केलेल्या एका मजेशीर विधानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हर्षित राणाला झालेल्या दुखापतीमुळे सिराजचा शेवटच्या क्षणी हिंदुस्थानच्या संघात समावेश करण्यात आला. त्यातच जसप्रीत बुमराह आजारी असल्यामुळे सिराजला थेट प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले. यावर भाष्य करताना बद्रीनाथ त्याच्या युट्यूब चॅनेलवर म्हणाला, “मोहम्मद सिराजने अप्रतिम गोलंदाजी केली. तो केवळ दोन दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये आरामात बिर्याणी खात होता. पण अचानक वर्ल्ड कपसाठी बोलावणे येऊनही त्याने कोणतीही कसर सोडली नाही आणि उत्कृष्ट स्पेल टाकला. सिराजने या सामन्यात ४ ओव्हरमध्ये २९ धावा देत ३ महत्त्वाचे बळी घेतले. विशेष म्हणजे, सिराजला जेव्हा सूर्यकुमारने फोन करून संघात सामील व्हायला सांगितले, तेव्हा त्याला ती थट्टा वाटली होती.

सूर्याची ‘कॅप्टन इनिंग’

दरम्यान, या सामन्यात एका वेळी यजमान संघाची अवस्था ७७ धावांवर ६ बाद अशी बिकट झाली होती. मात्र, कर्णधार सूर्यकुमार यादवने ४९ चेंडूत नाबाद ८४ धावांची ऐतिहासिक खेळी करून भारताला १६१ धावांपर्यंत पोहोचवले. याचे बद्रीनाथने कौतुक केले. तो म्हणाला, त्याने परिस्थितीनुसार खेळ केला. जेव्हा संघ अडचणीत होता, तेव्हा त्याने ‘रिस्क’ न घेता संयमी फलंदाजी केली आणि नंतर वेग वाढवला. सूर्याकडे प्रत्येक चेंडूसाठी उत्तर होते, म्हणूनच तो मैदानाच्या चारी बाजूंना फटके मारू शकला.

फलंदाजीवर ओढले ताशेरे

विजयानंतरही बद्रीनाथने हिंदुस्थानी फलंदाजांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. अमेरिकेसारख्या सरासरी आक्रमणासमोर हिंदुस्थानची वरची फळी कोसळणे चिंताजनक असल्याचे त्याने म्हटले. प्रत्येक वेळी नशिबाची साथ मिळेलच असे नाही, फलंदाजांनी परिस्थितीचा अंदाज घेऊन खेळायला हवा, असा सल्लाही त्याने दिला.