
गोलंदाजासाठी आपल्या कारकिर्दीतील पहिली विकेट नेहमीच खास असते. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्या सामन्याच्या पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याच भाग्य मिळणं, म्हणजे दुर्मिळचं. मात्र, हा दुर्मिळ क्षण मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हजारो चाहत्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला. नेपाळविरुद्ध इंग्लंड सामन्यात ही ऐतिहासिक कामगिरी नेपाळच्या शेर मल्ला या गोलंदाजाने केली आणि ICC T20 World Cup 2026 मध्ये इतिहास घडला.
शेर मल्ला याची टी20 वर्ल्ड कपसाठी नेपाळच्या संघात निवड झाली आणि पहिल्याच सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली. तसेच कर्णधार रोहित पॉडेलने त्याच्यावर विश्वास ठेवत त्याला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं. शेर मल्लाच्या समोर यावेळी फलंदाजी करता होता विस्फोटक सलामीवीर फलंदाज फिल सॉल्ट. मनावर कोणतही दडपण न ठेवता शेर मल्ला याने पहिला चेंडू टाकला आणि पहिल्या चेंडूवर फिल सॉल्टला तंबूचा रस्ता दाखवला. शेर मल्लाच्या धडाकेबाज सुरुवातीमुळे इंग्लंडला अवघ्या पाच धावांवर पहिला मोठा हादरा बसला. शेर मल्लाने तीन षटके फेकत 35 धावा खर्च केल्या आणि एक विकेट घेतली. हा सामना नेपाळला अवघ्या चार धावांनी गमवावा लागला. मात्र, नेपाळच्या झुंजार खेळीने चाहत्यांची मन जिंकली.
शेर मल्ला नेपाळ क्रिकेटच्या इतिहासातील दुसरा असा गोलंदाज आहे ज्याने टी20 कारकिर्दीच्या पहिल्याच सामन्यातील पहिल्याच षटकातील पहिल्याच चेंडूवर विकेट घेतलीये. यापूर्वी पारस खडका याने अशी कामगिरी केली आहे. त्याने हाँगकाँगविरुद्ध पहिल्याच चेंडूंवर विकेट घेतली होती. शेर मल्लाने नेपाळ A आणि 19 वर्षांखालील संघातून खेळताना दमदार कामगिरी केली आहे. याच कामगिरीच्या जोरावर त्याची वर्ल्ड कपमध्ये निवड झाली आहे.

























































