हसरंगामुळे श्रीलंका रंगात; आयरिश संघाचा 20 धावांनी पराभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पहिल्या दोन दिवसांतच टी-20 वर्ल्ड कपचे बदलणारे रंग दिसले. हा वेगवान वर्ल्ड कप आहे आणि इथे लिंबू-टिंबू संघ नुसते खेळणारच नाहीत तर जिंकणारही, असे संकेत मिळू लागलेत. आधी नेपाळने इंग्लंडला झुंजवले तर रात्री श्रीलंकेलाही आयरिश संघाने नाकात दम आणला. आयर्लंडला 6 षटकांत 60 धावांची गरज असताना सामना थरारक वळणावर होता, पण तेव्हाच वानिंदू हसरंगाने आयरिश संघाला दोन धक्के देत श्रीलंकेला रंगात आणले. 2 बाद 104 अशा सुस्थितीत असलेल्या आयर्लंडची 7 बाद 126 अशी घसरगुंडी उडाली आणि त्यांच्या हातातून सामनाही निसटला. यजमान लंकेने आयर्लंडचा 143 धावांत डाव गुंडाळत 20 धावांनी विजयी सलामी दिली.

164 धावांचा पाठलाग करताना आयर्लंडने जोरदार प्रयत्न केले. रॉस अडायरचे 34 आणि हॅरी टेक्टरच्या 40 धावा पाहून ‘काहीतरी होईल’ असं वाटलं. लॉर्पन टकर, कर्टिस पॅम्फर यांनी थोडाफार हातभार लावला. 14 षटकांत 2 बाद 104 धावांमुळे आयर्लंड विजयपथावर होता, पण तेवढय़ात हसरंगा आणि तिक्षणा मैदानात आले आणि दोघांनी आयरिश फलंदाजांची फिरकी काढली. दोघांनी प्रत्येकी तीन विकेट घेत आयर्लंडला विजयाच्या
ट्रकवरून खाली उतरवले. या विजयात कामिंदू मेंडिसचा 44 धावांचा झंझावात विजयात सर्वोत्तम ठरला.

त्याआधी नाणेफेक जिंपून फलंदाजीला उतरलेल्या श्रीलंकेची सुरुवात फारशी धडाकेबाज नव्हती. पथुम निसांका (24) आणि कमिल मिशारा (14) लवकर बाद झाले, पण मग मैदानात उतरलेल्या पुसल मेंडिसने एक टोक घट्ट पकडून ठेवत आयरिश गोलंदाजांना ‘जास्त उत्साह नको’ असा इशाराच दिला. त्याने नाबाद 56 धावा करत संघाला शेवटपर्यंत आधार दिला. मधल्या फळीत पवन रत्नायके आणि दुनिथ वेल्लालागे लवकर बाद झाले, मात्र खरी रंगत आली ती कामिंदू मेंडिसच्या फटक्यांनी. अवघ्या 19 चेंडूंतील 44 धावांनी त्याने आयरिश संघाचे सारे गणितच बिघडवले. दोन्ही मेंडिसांनी मिळून 67 धावांची वेगवान भागी रचत श्रीलंकेला 163 पर्यंत पोहोचवले.