
दिल्लीमध्ये होणारा नेदरलँड्स विरुद्ध नामिबिया सामना कागदावर मोठा वाटत नसला, तरी 2026 टी-20 वर्ल्डकपच्या दृष्टीने हा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. ग्रुप अ मध्ये हिंदुस्थान, पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यासोबत अडकलेल्या या दोन संघांसाठी हा सामना जिंकणे म्हणजे स्पर्धेत टिकून राहण्याची शेवटची संधी आहे. फक्त अव्वल दोन संघ सुपर एटमध्ये प्रवेश करणार असल्याने नेदरलॅण्ड्स नामिबियाला नमवून आपल्या विजयाचे खाते उघडण्यासाठी सज्ज झाला आहे.
नेदरलॅण्ड्सने पाकिस्तानविरुद्ध जोरदार खेळ करत हम किसीसे कम नहीं हे दाखवले होते. ते जिंकता जिंकता हरले होते, त्यामुळे उद्या त्यांना विजयच वाचवू शकतो. हरले तर त्यांचे स्थान डळमळीत होईल.दुसरीकडे नामिबियासाठी परिस्थिती अधिक कठीण आहे. या गटात ते अद्याप एकही सामना खेळलेले नाहीत. आफ्रिका पात्रता फेरीत सातत्य राखत सलग चौथ्यांदा वर्ल्डकपमध्ये पोहोचलेला हा संघ आत्मविश्वासाने मैदानात उतरणार हे नक्की. ऑक्टोबर 2025 नंतर हा त्यांचा पहिलाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामना असेल, पण त्याआधी दक्षिण आप्रैकेविरुद्ध शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारात त्यांनी ऐतिहासिक विजय मिळवला होता.
संभाव्य संघ असे असतील
नेदरलँड्स – मायकेल लेव्हिट, मॅक्स ओ’डाऊड, बास डी लिडे, कॉलिन ऍकरमन, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार व यष्टिरक्षक), झॅक लायन-कॅशेट, लोगन व्हॅन बीक, रोलोफ व्हॅन डर मर्व, आर्यन दत्त, कायल क्लाइन आणि पॉल व्हॅन मीकेरेन.
नामिबिया – लॉरेन स्टीनकॅम्प, यान फ्रायलिंक, यान निकोल लॉफ्टी-इटन, गेरहार्ड इरासमस (कर्णधार), जेजे स्मित, मलान क्रुगर, झेन ग्रीन (यष्टिरक्षक), रुबेन ट्रम्पलमन, बर्नार्ड शोल्ट्झ, बेन शिकोंगो आणि जॅक ब्रसेल.


























































