
देशातील कोट्यवधी नागरिकांच्या व्यावहारिक जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या यूपीआय सेवेने आज अचानक मान टाकली. ही सेवा ठप्प झाल्याने गुगल पे, फोन पे, पेटीएम, क्रेड, भीम अशा लोकप्रिय ऍप्सना फटका बसला आणि लाखो व्यवहार रखडले. त्यामुळे ऑनलाइन युजर्सची अक्षरशः घालमेल झाली. घबराट उडाली.
आज सायंकाळी सातच्या सुमारास ’डाऊनडिटेक्टर’ या प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन युजर्सच्या तक्रारींचा पाऊस सुरू झाला. काही वेळातच शेकडो तक्रारी नोंदवल्या गेल्या. कोणाच्या मोबाइलवरून डिजिटल पेमेंट होत नाही… पेमेंट वेळेवर जात नाही… क्यूआर कोड स्कॅन होत नाही… अशा वेगवेगळ्या तक्रारी युजर्स करत होते. काही युजर्सच्या मोबाइलवर सेवा प्रदाता उपलब्ध नाही असे संदेश येत होते.
सोशल मीडियावर प्रश्नांची लाट
डिजिटल पेमेंट सेवा ठप्प झाल्याने सोशल मीडियात प्रश्नांची आणि प्रतिक्रियांची लाटच आली. यूपीआय बंद आहे का? असे प्रश्न विचारले जाऊ लागले. अनेकांनी ’ट्रान्झॅक्शन फेल्ड’ दाखवणारे स्क्रीनशॉट शेअर केले. मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद आणि बेंगळुरू यासारख्या प्रमुख शहरांतील युजर्सना सर्वाधिक मनस्ताप सहन करावा लागला.

























































