बाप रे बाप… पाणीपुरी खायला ‘आला’ साप, विरारमधील घटनेने खवय्यांची पाचावर धारण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भैय्याजी एक पानीपुरी देना.. अशी आर्जवे खवय्ये करत होते. त्याचवेळी चक्क पाणीपुरीच्या माठात सरसर करत साप घुसला आणि सर्वांचीच पाचावर धारण बसली. बाप रे बाप.. पाणीपुरी खायला ‘आला’ साप असे म्हणत अनेकांनी हातगाडीजवळून पळ काढला. विरारमधील या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनीही ठसकेबाज प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

विरारमधील एका गजबजलेल्या रस्त्यावर पाणीपुरीची हातगाडी आहे. या हातगाडीवर नेहमीप्रमाणेच खवय्यांची गर्दी चहुबाजूंनी होती. चार ते पाच गिऱ्हाईक पाणीपुरी खाण्यासाठी भय्याजीला गराडा घालून उभे होते. भय्या तिखा बनाओ.. मिठा बनाओ.. असे त्यातील काहीजण सांगत होते. त्याचवेळी माठाभोवती गुंडाळलेल्या लाल फडक्यामागून चक्क एका सापाने मान वर काढली. फोडलेल्या पुरीत अंगठा घालून भय्या ही पुरी माठात बुडवणार तोच एकजण भय्याजी साप देखो असे ओरडला. घाबरलेल्या भय्याने हातातली पाणीपुरी तशीच टाकून बाजूला पळ काढला. खवय्येदेखील पांगले. त्यातीलच एकाने याचा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर टाकला आहे.

आरोग्याशी खेळ

शहरात ठिकठिकाणी उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री सुरू आहे. मात्र स्वच्छतेची कोणतीही खबरदारी घेतली जात नाही. पालिका अधिकारीही याकडे कानाडोळा करत असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी अशा पद्धतीने खेळ सुरू असल्याचे या घटनेवरून उघडकीस आले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सर्पमित्राने या ठिकाणी धाव घेत हरणटोळ जातीच्या या सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.