मध्यपूर्वेत युद्धाचे ढग! अमेरिकन लष्करी तळांवर विमानांचा राबता वाढला, इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ल्याची शक्यता?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्यपूर्वेतील भू-राजकीय परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली असून अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव आता शिगेला पोहोचला आहे. सॅटेलाईट फोटोंमधून समोर आलेल्या ताज्या माहितीनुसार, या भागात असलेल्या अमेरिकन लष्करी तळांवर लढाऊ विमाने, इंधन पुरवणारे टँकर्स आणि क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. प्लॅनेट लॅब्स आणि रॉयटर्सने जाहीर केलेल्या उपग्रह फोटोंमध्ये कतार, जॉर्डन आणि सौदी अरेबियातील तळांवर युद्धसदृश हालचाली स्पष्टपणे दिसत आहेत. संरक्षण तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेची ही वाढती सक्रियता एकतर इराणवर थेट हल्ला करण्याची तयारी असू शकते किंवा इराणकडून होणाऱ्या संभाव्य प्रत्युत्तराला रोखण्यासाठी उभारलेली बचावात्मक भिंत असू शकते.

राजकीय पातळीवरही या संघर्षाची धार तीव्र झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत नवीन अणुकरार करण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी, त्यांनी इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमावर पूर्णपणे बंदी घालण्याची अट घातली आहे. मात्र, इराणने ही मागणी फेटाळून लावल्याने पेच निर्माण झाला आहे. ट्रम्प यांनी इशारा दिला आहे की, राजनैतिक मार्गाने करार झाला नाही तर होणारा हल्ला अत्यंत विनाशकारी असेल. गेल्या वर्षी अमेरिकेने इराणच्या अणुस्थळांना लक्ष्य केले होते, त्या पार्श्वभूमीवर सध्याचा तणाव अधिक चिंताजनक मानला जात आहे. दुसरीकडे, इराणनेही सावध पवित्रा घेत आपली अणुस्थळे मातीने झाकण्यास आणि बोगदे बंद करण्यास सुरुवात केली असून, संभाव्य हल्ल्याचा मुकाबला करण्यासाठी ते सज्ज असल्याचे दिसत आहे.

एकीकडे दोन्ही देशांमध्ये वाटाघाटींचे प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे झालेली ही लष्करी सज्जता प्रादेशिक युद्धाला आमंत्रण देऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.