भिवंडीतील मीनाताई ठाकरे रंगायतनच्या दुरुस्तीचे काम दहा दिवसांत पूर्ण करा; आयुक्तांची ठेकेदाराला तंबी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भिवंडी पालिका क्षेत्रातील एकमेव सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय मीनाताई ठाकरे रंगायतन आठ वर्षांपासून बंद आहे. नाट्यगृहाची दुरुस्ती करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही ठेकेदाराने दिलेल्या मुदतीत काम पूर्ण केले नाही. त्यामुळे नाट्यकर्मी, नाट्यरसिक नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्त अनमोल सागर यांनी नाट्यगृहाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला. नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम दहा दिवसांत पूर्ण करा, अशी तंबीच आयुक्तांनी ठेकेदाराला दिली.

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यानंतर एक वर्षापासून दुरुस्तीचे काम सुरू आहे. ठेकेदारास दुरुस्ती कामासाठी दिलेली मुदत संपली असली तरी काम अपूर्ण आहे. त्यामुळे नाट्यप्रेमींमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यानंतर आयुक्त अनमोल सागर यांनी पालिका कार्यकारी अभियंता जमील पटेल, अतिरिक्त शहर अभियंता सचिन नाईक यांसह रंगायतनला भेट दिली.

… तर कार्यादेश रद्द करणार
नाट्यगृहाच्या कामाची गती पाहून आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदारास १० दिवसांची मुदत दिली आहे. या दहा दिवसांत जर कामात प्रगती झाली नाही तर कार्यादेश रद्द करण्यात येईल, अशी सक्त ताकीद आयुक्त सागर यांनी यावेळी दिली. तर शहर अभियंता यांनी दररोज दोन वेळा कामाच्या ठिकाणी भेट देऊन आढावा घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

पालिकेला शहराच्या सांस्कृतिक पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे कारण देत प्रशासनाने स्वर्गीय मीनाताई ठाकरे रंगायतनच्या देखभाल, दुरुस्तीकडे वारंवार दुर्लक्ष वैभवाशी काही देणेघेणे नसल्याची नाराजी नाट्यप्रेमींमध्ये आहे.