
आदिवासी खातेदारांच्या संरक्षित जमिनीवर वर्षानुवर्षे सुरू असलेला बेकायदेशीर कब्जाचा खेळ अखेर महसूल प्रशासनाने उधळून लावला. बोईसर दांडीपाडा येथील आदिवासींच्या जमिनीवर उभारलेल्या भूमाफियांच्या चाळीवर आज बुलडोझर चालवण्यात आला. या कारवाईत दीड एकर क्षेत्रावर उभारलेल्या १५० हून अधिक खोल्या जमीनदोस्त करण्यात आल्या.
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील कलम ३६ व ३६-अ तसेच महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमीन प्रत्यार्पित करणे अधिनियम, १९७४ अंतर्गत आदिवासींच्या जमिनी संरक्षित आहेत. तरीही अधिकाऱ्यांना हाताशी धरून भूमाफियांनी काही वर्षांपासून बोईसरच्या दांडीपाडा परिसरातील आदिवासींच्या जमिनी बळकावल्या आहेत. अखेर मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्यानंतर महसूल प्रशासनाने बेकायदा चाळींवर तोडक कारवाई केली. भूमाफियांच्या बेकायदा कृत्यामुळे अनेकांचे संसार मात्र रस्त्यावर आले.
अधिकारी ठाण मांडून
पालघर तहसीलदार यांच्या आदेशानुसार आदिवासींच्या जमिनीवरील बेकायदा घरे हटवण्याची मोहीम सुरू आहे. महसूलचे वरिष्ठ अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, पोलीस निरीक्षक सुनील जाधव घटनास्थळी ठाण मांडून होते.






























































