
>> अरुण
आाक्टोपस म्हणजे मराठीत अष्टपाद. चार पायांच्या जनावरांना आपण चतुष्पाद म्हणतो. माणूस दोन पायांचा द्विपाद प्राणी, तसा आठ पायांचा आाक्टोपस. हा गिळगिळीत शरीराचा सागरी जीव विलक्षण चतुर असतो. तो आकार बदलतो, रंग बदलतो. गप्प राहून संधीची वाट पाहतो आणि सावधपणे भक्ष्यावर झेप घेतो. म्हणजे त्याला आठ पायांनी कवटाळतो. सागरतळींचे छोटे जीव हे त्याचे खाद्य. तसा तो उपद्रवी नाही. पण त्याच्या प्रांतात ढवळाढवळ करणाऱया ड्रायव्हर्सना (पाणबुडय़ांना) त्याचा तडाखा बसू शकतो.
हे लिबलिबीत जीव साधारणपणे 15 ते 20 किलो वजनाचे असतात. त्यांची लांबी 30 फुटांपर्यंत वाढू शकते. छोटय़ा आकाराचे आाक्टोपस जगातल्या सर्वच समुद्रात आढळतात. काही वेळा ते भरतीच्या वेळी किंवा समुद्र पावसाळय़ात खवळलेला असताना सुसाट लाटांबरोबर, किनाऱयावरही येऊन पडतात. लाल-तपकिरी रंगाच्या या प्रजातींची नजर तीक्ष्ण असते. पृथ्वीच्या पृष्ठभागावर कधीकाळी विनाशक स्थिती ओढवली तरी पासिफिक समुद्रासारख्या जास्तीत जास्त 11 किलोमीटर खोल जलसाठय़ामधल्या सूक्ष्म कडेकपारीत हे जीव तग धरू शकतील असं म्हणतात. त्यामुळे प्रलयानंतरच्या नव्या जीवसृष्टीत त्यांचे वर्चस्व असेल असेही सांगितले जाते. जैविक प्रजातींचा शोध घेणारे अनेक सूक्ष्म आणि महाकाय सजीवांच्या नोंदी करतायत. त्यातच आहेत, मुख्यत्वे उत्तर पासिफिक महासागरातले ‘जायन्ट आाक्टोपस.’ एखाद्या बसच्या आकाराचे हे आाक्टोपस 300 किलो वजनापर्यंत वाढतात. पाच-सात वर्षे जगतात. या काळात या राक्षसी आाक्टोपसचा आहार मासे, खेकडे आणि छोटे शार्क मासेसुद्धा असतो. प्रजननानंतर त्यांचे नर नष्ट होतात. मादी नवजात अर्भकांना वाढवते.
ऑक्टोपसना सागरतळाच्या विहारामधील ‘दिशा’ज्ञान असते. त्यासाठी त्यांना नैसर्गिक ‘आप’ लाभलेले आहे. त्यामुळे रस्ता चुकणे असे होत नाही. तशी ही आाक्टोपस मंडळी एकमेकांना सांभाळून राहतात आणि संकटप्रसंगी शरीराचा संकोच करून समुद्राखालच्या चिंचोळय़ा कपारींमध्ये आश्रय घेतात. एखाद्या बरणीचं झाकणही उघडून बघण्याची अक्कल आाक्टोपसला असते. अशा या शक्कलबाज जीव अनंतकाळचा सागरनिवासी ठरणार आहे.
























































