
मंत्रालयातील कार्यालयात कर्मचारी लाच घेताना रंगेहाथ पकडला गेल्यापासून नॉट रिचेबल असलेले अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आता या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. लाचखोर लिपिक राजेंद्र ढेरंगे याची चौकशी करून त्याचा अहवाल बंद लिफाफ्यात सादर करण्यास त्यांनी सांगितला आहे.
राजेंद्र ढेरंगे याची चौकशी करण्याचे निर्देश झिरवाळ यांनी आपल्या विभागातील दक्षता पथकाला दिले आहेत. या लाचखोरीमागे केवळ ढेरंगे हा एकटाच नसून विभागातील अन्य काही मंडळीही त्यात गुंतलेली असू शकते. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि अहवाल शक्य तितक्या लवकर पाठवण्यात यावा, अशा सूचना झिरवाळ यांनी दिल्या आहेत. ढेरंगे हा मूळचा अन्न व नागरी पुरवठा विभागाचा कर्मचारी असून त्याची प्रतिनियुक्ती रद्द करून त्याला त्याच्या मूळ विभागात पाठवण्यात यावे, असेही त्यांनी नमूद केले.
आज सुनेत्रा पवार घेणार तातडीची बैठक
या लाचखोरीनंतर झिरवाळ यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक सोमवारी सायंकाळी बोलवली आहे. त्या बैठकीत त्यावर चर्चा होणार आहे. या लाचखोरी प्रकरणानंतर अमोल मिटकरी वगळता पक्षातील कुणीही झिरवाळ यांच्या बाजूने प्रतिक्रिया दिलेली नाही. या बैठकीत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीबाबतही निर्णय घेतला जाणार असे समजते.





























































