प्रदूषणाचा विळखा… उकाडय़ाचा ताप! मुंबईचे तापमान 36 अंशांच्या घरात, हवेचा गुणवत्ता निर्देशांक 200 अंकांच्या पुढे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई शहरातील प्रदूषणाचा विळखा दिवसेंदिवस आणखी घट्ट होत चालला आहे. रविवारी शहर आणि उपनगरातील 24 ठिकाणी प्रदूषित हवेची नोंद झाली. तेथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 200 अंकांच्या पुढे गेला. याचवेळी शहराचे तापमान 36 अंशांच्या घरात गेले. प्रदूषणाचा विळखा आणि उकाडय़ाचा ताप अशा विचित्र वातावरण बदलामुळे मुंबईकरांची प्रचंड दमछाक आणि लाहीलाही झाली.

शहरात नियोजनशून्य पद्धतीने सुरू असलेले बांधकाम प्रकल्प आणि रस्ते काँक्रीटीकरणामुळे प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. रविवारी शहर आणि उपनगरांतील 24 भागांत हवेची गुणवत्ता ढासळली. एक्यूआय 200 अंकांच्या पुढे नोंद झाला. मुंबईतील प्रदूषणाची तीव्रता आसपासच्या शहरांपेक्षा अधिक नोंद होत आहे. नवी मुंबईत 184 अंक एक्यूआय होता. त्यापेक्षा मुंबईत प्रदूषण होते. मागील अनेक दिवसांपासून शहरातील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. प्रदूषण नियंत्रणात प्रशासन अपयशी ठरल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. अचानक होणारी तापमानवाढ आणि वाढते प्रदूषण याचा नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहे.

प्रदूषणाचे हॉटस्पॉट

जुहू तारा-230, अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला का@म्प्लेक्स-224, वडाळा-223, पुलाबा नेव्ही नगर- 222, गोवंडी शिवाजीनगर-221, वांद्रे पश्चिम -217, चेंबूर गावठाण – 215, शिवडी -214, कांदिवली ठापूर व्हिलेज-205, पवई हिरानंदानी गार्डन आणि मालाड पश्चिम-203 आणि अंधेरी आंबोली-201 अशी एक्यूआयची नोंद करण्यात आली. या भागांत प्रदूषण चिंताजनक पातळी गाठत आहे. त्यामुळे नागरिकांची प्रचंड घुसमट होऊ लागली आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्गात उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

राज्याच्या ग्रामीण भागात उन्हाचे चटके बसायला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने काही जिह्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पुढील दोन दिवस उष्णतेचा ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मराठवाडय़ात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड व परभणी या जिह्यांत उष्णतेची तीव्रता अधिक असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.