
सामान्यतः लोक आपले पैसे आणि दागिने सुरक्षित राहतील या विश्वासाने बँकेच्या लॉकरचा वापर करतात. मात्र, बंगळुरूमध्ये एका बँक अधिकाऱ्यानेच ग्राहकांच्या विश्वासाला तडा देत, त्यांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सट्टा लावण्यासाठी बँक अधिकाऱ्याने चक्क ग्राहकांचे लॉकर फोडत तब्बल साडे तीन कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. ‘इंडिया टीव्ही‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
वृत्तानुसार, ही घटना बंगळुरूच्या इंडियन बँक, गिरीनगर शाखेत घडली आहे. बँकेच्या व्यवस्थापकांनी डेप्युटी मॅनेजरविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा. या प्रकरणी पोलिसांनी 34 वर्षीय किरण कुमार याला अटक केली आहे. त्याने बँकेच्या विविध ग्राहकांचे सुमारे 2,780 ग्रॅम सोने चोरून गहाण ठेवले होते.
आरोपी किरण कुमार याने बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणतीही कल्पना न देता लॉकरमधून दागिने काढले आणि ते एका फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवले. यातून मिळालेले पैसे त्याने ऑनलाइन सट्टेबाजीमध्ये उडवले. बँकेच्या लॉकरमधून सोने गायब होत असल्याचा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणी 5 फेब्रुवारी रोजी गिरीनगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 316 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपीला ऑनलाईन सट्टेबाजीचे व्यसन जडल्याचे स्पष्ट झाले. जून 2025 ते जानेवारी 2026 या दरम्यान आरोपीने बँकेच्या ग्राहकांच्या लॉकरमधून सोने चोरल्याची कबुली दिली. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या ताब्यातून 700 ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणात फायनान्स कंपन्यांकडून तपासात अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने आम्ही न्यायालयात धाव घेणार आहोत, अशी माहिती दक्षिण विभागाचे पोलीस उपायुक्त लोकेश बी. जगलासर यांनी दिली.
दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर बंगळुरू पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ज्या ग्राहकांनी बँकेच्या लॉकर सुविधेचा वापर केला आहे, त्यांनी वेळोवेळी बँकेत जाऊन आपल्या दागिन्यांची आणि लॉकरची स्थिती तपासावी, असा सल्ला पोलिसांनी दिला आहे.
























































