भाजपने टिपू प्रकरणामध्ये ‘आ बैल मुझे मार’ करून महाराष्ट्राचं वातावरण बिघडवू नये! – संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय जनता पक्षाने टिपू प्रकरणामध्ये ‘आ बैल मुझे मार’ करून महाराष्ट्राचं वातावरण बिघडवू नये, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले. सोमवारी सकाळी ते दिल्लीत माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी टिपू प्रकरणावरून सुरू असलेल्या वादावर त्यांनी भाष्य केले.

संजय राऊत म्हणाले, भाजपला ना काम, ना धंदा. भाजपने जनतेचे प्रश्न, शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, नोकरदारांच्या प्रश्नावर आंदोलन केले का? मुंबईत मेट्रोच्या पुलाचा भाग कोसळून लोक मरण पावले, हे त्यांचेच पाप आहे. प्रे. ट्रम्पने देशाला गुलाम केले, त्याच्यावर भाजपच्या लोकांनी प्रश्न विचारले का? पण जिथे हिंदू-मुसलमानांच्या संदर्भात ठिणगी टाकता येईल असे प्रश्न निर्माण करायचे आणि लोकांना भ्रमिष्ट करायचे.

मालेगाव महानगरपालिकेत उप महापौरपदांच्या दालनात टिपू सुलतान याचा फोटो लागला होता. लोकांनी आक्षेप घेतल्यावर तो फोटो काढण्यात आला. हा विषय तिकडे संपवायला हरकत नव्हती. पण भाजपने आणि त्यांच्या इतर छोट्या, मोठ्या कंपन्यांनी महाराष्ट्रभर आंदोलन सुरू केले. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे हे सांगायला भाजपची गरज नाही. इतिहासामध्ये काही गोष्टींची नोंद आहे, ती भाजपलाही बदलता येणार नाही, असे राऊत म्हणाले

टिपू सुलतान विषयी आता भाजप ज्या भूमिका मांडतेय, त्यांनी इतिहासात टिपू सुलतान विषयी आपण काय भूमिका घेतल्या होत्या तो रेकॉर्ड तपासावा. कर्नाटकच्या विधानसभेत भाजपने नेमलेले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टिपू सुलतानचा राष्ट्रपुरुष म्हणून गौरव केला. रामनाथ कोविंद राष्ट्रपती असताना कर्नाटकात गेले आणि त्यांनी टिपू सुलतावर गौरवाची फुले उधळली, तेव्हा तुम्ही का नाही रोखले? असा सवाल राऊत यांनी केला.

सामना अग्रलेख – टिपूच्या नावाने भाजपच्या टिपऱ्या!

महाराष्ट्रात अकोला महानगरपालिकेत भाजपची सत्ता असताना टिपूच्या नावाने अनेक प्रकल्प सुरू केले. मुंबई महानगरपालिकेमध्ये टिपू सुलतानच्या नावाने रस्ते आणि बगिच्याला नावे देण्यासाठी विद्यमान महापौर रितू तावडे, अमित साटम यांचे अनुमोदन आहे. त्यामुळे भाजपने टिपू प्रकरणामध्य़े ‘आ बैल मुझे मार’ करून महाराष्ट्राचे वातावरण बिघडवू नये. आता पुढल्या दोन तीन वर्ष कोणत्याही निवडणुका नाहीत, उगाच कशाला तोंडाचा फेस काढताय. ज्या गोष्टींची इतिहासामध्ये नोंद आहे, तो इतिहास तसाच राहील, असेही राऊत म्हणाले.

टिपू कमळाबाईचा लाडका… मुंबईतील दोन रस्ते आणि अकोला पालिकेतील सभागृहाला नाव दिले; काँग्रेसने पुराव्यानिशी बुरखा फाडला

टिपू सुलतान हा 1799 साली इंग्रजांशी लढताना श्रीरंगपट्टणमच्या किल्ल्यात मृत्यू पावला. त्याच्यामुळे काही इतिहासकार त्याला स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांशी लढताना मरण पावलेला पहिला स्वातंत्र्य सैनिक म्हणतात. परंतु भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आम्ही ब्रिटिशांविरुद्ध लढलो, शहीद झालो हे दाखवावे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांविरुद्ध लढताना भाजप कुठे होता हे त्यांनी जाहीर करावे, असेही राऊत म्हणाले. तसेच टिपू सुलतान याची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना चुकीची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांशी कुणाचीही तुलना होऊ शकत नाही. तो करण्याचा प्रयत्न करू नये, ही पक्षाची भूमिका ‘सामना’मध्ये स्पष्ट केलेली आहे. शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्वत: निर्माण केले आणि टिपूला वारसा हक्काने राज्य मिळाले, ते त्याने वाढवायचा प्रयत्न केला. पण छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केले, त्यांना वारशाला मिळालेले नव्हते, असेही राऊत म्हणाले.

टिपू सुलतानवरून घमासान! पुण्यात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा तोडफोड, तुफान दगडफेक; दोन महिला कॉन्स्टेबलसह नऊजण जखमी