सनई चौघडे वाजणार…रश्मिका आणि विजय अडकणार विवाहबंधनात; उदयपूरमध्ये रंगणार शाही सोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात लाडकी जोडी, विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना अखेर विवाहबंधनात अडकणार आहेत. येत्या 26 फेब्रुवारी 2026 रोजी या दोघांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे कपल राजस्थानमधील उदयपूर येथे भव्य ‘डेस्टिनेशन वेडिंग’ करणार असून लग्नानंतर 3 मार्च रोजी हैदराबादमध्ये चित्रपटसृष्टीतील मित्रमंडळी आणि नातेवाईकांसाठी एका खास रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे, ज्याचे निमंत्रण सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

लग्नाच्या रिसेप्शनच्या निमंत्रण पत्रिकेने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पत्रिकेत विजयने आपल्या भावना व्यक्त करताना लिहिले आहे की, “आमच्या आयुष्यातील एका मोठ्या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहोत. कुटुंबीयांच्या आशीर्वादाने मी आणि रश्मिका 26 फेब्रुवारी रोजी एका अत्यंत खाजगी सोहळ्यात विवाहबंधनात अडकत आहोत. आमच्या या नवीन प्रवासाची सुरुवात तुमच्या उपस्थितीत आणि आशीर्वादाने व्हावी, अशी आमची इच्छा आहे.” 3 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजेपासून या सेलिब्रेशनला सुरुवात होणार असल्याचेही निमंत्रण पत्रिकेत नमूद करण्यात आले आहे.

विजय आणि रश्मिका यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून रंगत होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हैदराबादमध्ये एका खाजगी कार्यक्रमात या दोघांचा साखरपुडा झाल्याचे बोलले जाते. जरी या दोघांनी अधिकृतपणे याची पुष्टी केली नव्हती, तरीही विविध कार्यक्रमांमध्ये त्यांची केमिस्ट्री सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.