
मुंबईतील मोक्याचे भूखंड बिल्डरांच्या घशात घालणाऱया महायुती सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सोमवारी आगामी आर्थिक वर्षासाठी 48 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताब्यातील एमएमआरडीएने येत्या वर्षभरात वडाळा आणि वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील मोक्याचे भूखंड विकून 11 हजार कोटी कमावण्याचे टार्गेट ठेवले आहे. आर्थिक परिवर्तनाचा दिखावा करीत एमएमआरडीएने थेट मोक्याच्या भूखंडांवर डोळा रोखला आहे.
एमएमआरडीएने 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 48,072.57 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. यापूर्वी 2024-25 मध्ये 7468 कोटी रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प सादर केला होता. येत्या आर्थिक वर्षासाठी वित्तीय अधिक्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. महानगरात विविध प्रकल्पांचा धडाका लावत असल्याचे एमएमआरडीएने अर्थसंकल्पातून जाहीर केले. मात्र त्याचवेळी निधी उभारण्याकरिता मुंबईतील मोक्याचे भूखंड विक्रीला काढले आहेत. प्राधिकरणाने सोमवारी अर्थसंकल्पातील तरतूद आणि खर्चाची आकडेवारी जाहीर केली. 48,072.57 कोटी रुपयांची अपेक्षित आर्थिक प्राप्ती आणि 48,072.40 कोटी रुपयांच्या प्रस्तावित खर्चामुळे अर्थसंकल्पात 17 लाखांचा अधिशेष दाखवण्यात आला आहे. भूखंड वापरातून संरचित निधी उभारणी, अर्बन ट्रान्सपोर्ट फंड (यूटीएफ) बळकटीकरण, प्रकल्पांशी संबंधित महसुलात वाढ याचा अर्थसंकल्पात ऊहापोह करण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय भागीदारी आणि संस्थात्मक वित्तपुरवठय़ाच्या माध्यमातून भांडवल उभे करणार असल्याचे एमएमआरडीएने म्हटले आहे. विकासाला प्राधान्य देत असल्याचे चित्र उभे करीत एमएमआरडीएने विकास प्रकल्प व योजनांसाठी एकूण खर्चाच्या 87.42 टक्के म्हणजेच 42,026.14 कोटींची तरतूद केली आहे.
भुयारी मार्गांसाठी 5,543.51 कोटी
एमएमआरडीए वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी भुयारी मार्गांचा विस्तार करणार आहे. या मार्गांसाठी एकूण 5,543.51 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. यात ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह कोस्टल रोड, गायमुख ते फाउंटन हॉटेल, ठाणे ते बोरिवली चार पदरी भुयारी मार्ग, मुंबई इंटिग्रेटेड टनेल या भुयारी मार्गांचा समावेश आहे. तसेच मुख्य वाहतूक मार्गांची जोडणी आणि मल्टि-रिंग रोड नेटवर्कवर 12,816.53 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
तिसऱ्या मुंबईसाठी 4,600 कोटींची तरतूद
ग्रोथ हबच्या माध्यमातून तिसऱया मुंबईचा विकास केला जाणार आहे. त्याअंतर्गत केएससी (कर्नाळा-साई-चिरनेर) नवी वसाहत- 4 हजार कोटी, रायगड पेण विकास केंद्र -500 कोटी, खारबाव एकात्मिक बिझनेस पार्क – 100 कोटी अशाप्रकारे मुंबई महानगरात एकूण 4,600 कोटी खर्च होतील. तसेच मुंबई महानगरातील 13 मेट्रो मार्गिकांसह तेथील विविध कामांसाठी एकूण 13,838.88 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
इतर कामांसाठी आर्थिक तरतूद
माता रमाबाई आंबेडकर नगर एसआरए 551.00 कोटी
पुनर्वसन व पुनर्स्थापना 150.00 कोटी
परवडणारी भाडेतत्त्वावरील घरे 30.33 कोटी
सूर्या प्रादेशिक जलपुरवठा योजना 67.00 कोटी
देहरजी मध्यम प्रकल्प 247.07 कोटी
पोशीर धरण व अन्य प्रकल्प 466.80 कोटी
हवामान बदल सक्षम भविष्य 250.00 कोटी
एकात्मिक डिजिटल कार्यक्रम, प्रादेशिक
माहिती प्रणाली व इतर उपक्रम 235.34 कोटी
23,711.16 कोटी रुपयांचे कर्ज काढणार
एमएमआरडीएने भूखंड विक्रीतून 11 हजार 177.95 कोटी कमावण्याबरोबरच 23,711.16 कोटींचे कर्ज, अर्बन ट्रान्सपोर्ट फंड – 6,368.42 कोटी, राज्य अधीनस्थ कर्जे – 3,520.00 कोटी, प्रकल्प संचालनातून 441.71 कोटी, शासकीय अनुदाने व टीडीआरद्वारे 1,189.14 कोटी, भूभाडे आणि व्याज उत्पन्न – 1,664.19 कोटी रुपये अशाप्रकारे उत्पन्न मिळवण्याचे नियोजन एमएमआरडीएने केले आहे.
बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक, महापौर निवासासाठी 171.50 कोटी
एमएमआरडीएने आपल्या अर्थसंकल्पात महान नेत्यांच्या स्मारक उभारणीसाठी निधीची तरतूद केली आहे. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक (भाग 1 व 2) आणि महापौर निवासासाठी 171.50 कोटी रुपये, इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भव्य स्मारकासाठी 400.00 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.































































