सुपर एटचे सामने ठरल्याप्रमाणेच; क्रमवारी लाभलेले संघच सुपर एटमध्ये, फक्त ‘ब’ गटाचा फैसला आज लागणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयसीसीने टी-20 वर्ल्ड कपचा कार्यक्रम जाहीर करताना महत्त्वाच्या आठ संघांना क्रमवारी देत त्यांच्या चाहत्यांना लढतींचा अंदाज दिला होता. आयसीसीच्या क्रमवारीनुसार आठपैकी सात संघांचे स्थान पक्के झाले असून केवळ ‘ब’ गटातील चुरशीमुळे एका संघाचे भाग्य ठरायचे बाकी आहे. मात्र असे असले तरी हिंदुस्थानच्या सुपर एट लढती अहमदाबाद, चेन्नई आणि कोलकाता या ठिकाणी खेळल्या जाणार असून प्रतिस्पर्धी संघही जवळजवळ निश्चित झाले आहेत.

आयसीसीने वर्ल्ड कप क्रमवारीत हिंदुस्थानला एक्स 1, ऑस्ट्रेलियाला एक्स 2, वेस्ट इंडीजला एक्स 3, दक्षिण आफ्रिकेला एक्स 4 तर इंग्लंडला वाय 1, न्यूझीलंडला वाय 2, पाकिस्तानला वाय 3 आणि श्रीलंकेला वाय 4 ही क्रमवारी दिली होती. सध्याची स्थिती पाहता ‘अ’ गटातून हिंदुस्थान, पाकिस्तान, ‘क’ गटातून इंग्लंड, वेस्ट इंडीज यांनी सुपर एटमध्ये धडक मारली आहे. ‘ड’ गटातून दक्षिण आफ्रिका विजयाच्या हॅटट्रिकसह सुपर एटमध्ये पोहोचलाय, तर न्यूझीलंडचाही प्रवेश जवळजवळ निश्चित मानला जात आहे. फक्त कॅनडाने त्यांना मंगळवारी चेन्नईत होणाऱया लढतीत हरवण्याचा चमत्कार केला तर अफगाणिस्तानसाठी सुपर एटची अंधूक आशा निर्माण होऊ शकते. पण त्यांना कॅनडाचा धुव्वा उडवत न्यूझीलंडपेक्षा सरस धावगती गाठावी लागेल. पण सध्याकॅनडाचा खेळ पाहता हे जरा अवघडच वाटतेय.

या स्पर्धेत आतापर्यंत एकच सनसनाटीपूर्ण विजयाची नोंद झाली आहे, ती म्हणजे झिम्बाब्वेने केलेला ऑस्ट्रेलियाचा पराभव. या पराभवामुळे ऑस्ट्रेलिया ब गटात काहीशी मागे पडला होती आणि आता श्रीलंकेविरुद्धच्या पराभवामुळे त्यांच्यावर साखळीत गारद होण्याचे संकट ओढवले आहे. या गटात ऑस्ट्रेलियाला हरवत श्रीलंका सुपर एटमध्ये पोहोचलीय, तर ऑस्ट्रेलियासाठी सुपर एट गाठणे अवघड झाले आहे. मंगळवारी झिम्बाब्वेने आयर्लंडचा पराभव केला तर तेसुद्धा सुपर एट गाठतील आणि ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर फेकला जाईल. फक्त आयर्लंड जिंकली तर ऑस्ट्रेलियाच्या जिवात जीव येईल. दुऱ्या संघाचा फैसला उद्या नाही, तर शुक्रवारी होईल. सध्या सुपर एटसाठी झिम्बाब्वेचे पारडे जड मानले जात असल्यामुळे येत्या 26 फेब्रुवारीला चेन्नईत हिंदुस्थानची गाठ झिम्बाब्वेविरुद्धच पडू शकते. पण आयर्लंड जिंकला तर दुसऱया संघाचा सस्पेन्स आणखी वाढेल.

हिंदुस्थानच्या सुपर एट लढती

22 फेब्रु. दक्षिण आफ्रिका – अहमदाबाद

26 फेब्रु. झिम्बावे/ऑस्ट्रे. – चेन्नई

1 मार्च. वेस्ट इंडीज  – कोलकाता