
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपने रविवारी काँग्रेस भवन परिसरात आंदोलन केले. त्यावेळी भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी भारतीय जनता पक्ष, काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिलेल्या परस्पर विरोधी तक्रारीनुसार दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यविषयी अवमानकारक वक्तव्य केले आहे. त्याच्या निषेधार्थ भाजपच्या कार्यकर्त्यांनी रविवारी काँग्रेस भवनसमोर आंदोलन केले. वक्तव्याच्या निषेध करताना भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. या घटनेत काँग्रेसचे तीन, तसेच भाजपचे दोन असे पाच कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले. दोन पोलीस कर्मचारी, दोन पत्रकार किरकोळ जखमी झाले होते. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीनंतर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष नगरसेवक धीरज घाटे, तसेच काँग्रेसचे पदाधिकारी नगरसेवक अरविंद शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
धीरज घाटे, अरविंद शिंदेसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल
भाजपचे शहराध्यक्ष नगरसेवक धीरज घाटे, युवा मोर्चाचे पदाधिकारी दुष्यंत मोहोळ यांच्यासह 50 ते 60 कार्यकर्त्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत काँग्रेसच्या कार्यकर्त्या प्राची नितीन दुधाणे (42) यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान, काँग्रेसचे पदाधिकारी अरविंद शिंदे, गौरव बाळंदे, अक्षय जैन, सागर धाडवे यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. भाजपचे पदाधिकारी पुनित श्रीकांत जोशी (35) यांनी फिर्याद दिली आहे.



























































