
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (BNP) नेते तारिक रहमान यांनी आज बांगलादेशचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. संसदेच्या ‘दक्षिण प्लाझा’मध्ये झालेल्या एका सोहळ्यात राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्यात हिंदुस्थानच्या वतीने सहभागी होण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला ढाका येथे पोहोचले आहेत.
पंतप्रधान तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील या नवीन सरकारमध्ये एकूण ४९ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये २५ कॅबिनेट मंत्री आणि २४ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. प्रदीर्घ काळानंतर सत्तेत परतलेल्या बीएनपीने अनुभवाच्या जोरावर प्रशासनात मोठे फेरबदल करण्याचे संकेत दिले आहेत.
या शपथविधी सोहळ्याला जगातील विविध देशांतील सुमारे १,२०० पाहुणे उपस्थित होते. यामध्ये भूतानचे पंतप्रधान त्शेरिंग तोबगे, मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू, पाकिस्तानचे नियोजन मंत्री अहसान इक्बाल यांच्यासह नेपाळ आणि श्रीलंका या देशांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते.

























































