
साताऱयाच्या दरे गावाजवळील शेतात थाटलेला ड्रग कारखाना उद्ध्वस्त केल्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-7 ने सोलापूर कारागृहाच्या बाळू चव्हाण (39) या शिपायाला बेडय़ा ठोकल्या आहेत. त्यांनी कारागृहात कैद असलेल्या फैयाज शेख याला बाहेरच्या आरोपींसोबत बोलण्याकरिता अनेकदा फोन दिला होता. मोबदल्यात चव्हाण यांना आर्थिक मदत झाल्याचे सांगण्यात येते.
गुन्हे शाखेच्या युनिट-7 ने साताऱयाच्या दरे गावाजवळील एका शेतात प्लॅस्टर नसलेल्या विटांच्या शेडमध्ये थाटलेला एमडी ड्रगचा कारखाना उद्ध्वस्त केला होता. त्यात बऱयाच ड्रग तस्करांना अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या तपासात या गुह्यातला मुख्य आरोपी सोलापूर कारागृहात पैद असलेला फैयाज शेख हा आतून अटक आरोपींना ड्रग फॅक्टरी चालविण्याबाबत सूचना देत होता. शिवाय फैयाज हा त्याचा परदेशात असलेला मुलगा फहाद याच्याही संपर्कात होता असे समोर आले. फैयाज मोबाईलच्या माध्यमातून बाहेर असलेल्या अन्य सहकाऱयांना ड्रग कसे बनवायचे, कुठे आणि कोणाला विकायचे याबाबत सांगत होता. यासाठी बाळू चव्हाण त्यांचा मोबाईल फैयाजला वापरायला द्यायचे. मोबदल्यात चव्हाण यांना अर्थ पुरवठा झाल्याचे तपासात समोर आल्याने चव्हाण यांना अटक करण्यात आली. त्यानंतर चव्हाण यांना मोक्का न्यायालयात हजर केले असता त्यांना 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते.
बाळू चव्हाण यांचा मोबाईल जप्त करण्यात आला असून तो न्यायवैधक प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. चव्हाण यांनी फैयाजला मोबाईल वापरण्यास देण्याबरोबर अजून काय मदत केली, याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
























































