
सुपर एटमध्ये आधीच स्थान पक्के केलेल्या हिंदुस्थानचा मोर्चा आता विजयाच्या चौकाराकडे वळला आहे. नेदरलॅण्ड्सविरुद्धच्या सामन्यात सलामीवीर अभिषेक शर्मा मोठी खेळी करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. सलग दोन डावांत खातेही न उघडू शकल्याने त्याच्यावर टीका झाली असली तरी त्याची आक्रमक शैली प्रतिस्पर्ध्यांसाठी कायम धोकादायक ठरली आहे.
अमेरिकेविरुद्ध शून्यावर बाद झाल्यानंतर पोटाच्या संसर्गामुळे अभिषेक नामिबियाविरुद्ध खेळू शकला नव्हता. पाकिस्तानविरुद्ध पुनरागमन झाले, पण पुन्हा तो अपयशी ठरला. मात्र दुसऱया टोकाला इशान किशनच्या तुफानी फलंदाजीमुळे संघावर त्याचा परिणाम झाला नाही. हिंदुस्थानला सुपर एटमध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडीजशी भिडायचे आहे. या महत्त्वाच्या सामन्यांसाठी अभिषेकचा झंझावाती फॉर्म महत्त्वाचा आहे.





















































