
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे सादर करणारा स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आज विधिमंडळाच्या हक्कभंग समितीसमोर हजर राहिले. मात्र, तक्रारदार भाजप आमदार प्रवीण दरेकर गैरहजर राहिल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. आता या प्रकरणाची सुनावणी 10 मार्च रोजी होणार आहे.
‘ठाणे की रिक्षा चेहरे पर दाढी’ असे विडंबन गीत सादर करणारा स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा व शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान परिषदेत भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी हक्कभंग मांडला होता. सभापती राम शिंदे यांनी हक्कभंगाची सूचना दाखल करून घेत पुढील कारवाईसाठी विशेषाधिकार समितीकडे पाठवीत असल्याचे घोषित केले होते. त्यानुसार समितीने कामरा व अंधारे यांना नोटीस पाठवून चौकशीसाठी उपस्थित राहण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. कामरा व अंधारे आज हक्कभंग समितीसमोर उपस्थित राहिले होते. मात्र, तक्रारदार दरेकर हे गैरहजर राहिल्याने या प्रकरणाची सुनावणी आता 10 मार्च रोजी ठेवण्यात आली आहे.
कामराचे संविधान टी शर्ट
हक्कभंग सुनावणीनिमित्त उपस्थित राहिलेला कुणाल कामरा वर्षभरानंतर मुंबईत आला होता. सुनावणीसाठी आलेल्या कामराने घातलेल्या टी-शर्टने लक्ष वेधून घेतले होते. टी-शर्टवर संविधानाचे पुस्तकाचे चित्र छापलेले होते. या टी-शर्टची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती., मी संविधानाला मानतो. आज सुनावणीला हजर राहिलो होतो, पण सुनावणी होऊ शकली नाही. पुढच्या सुनावणीला मी नक्की येईन. माझ्यावर जे आरोप ठेवले आहेत त्यावर मी योग्य उत्तर देईन, असे कामराने सांगितले.
Breach of Privilege: Kunal Kamra and Sushma Andhare Appear Before Committee; Hearing Adjourned
The Maharashtra Legislature’s privilege committee adjourned the hearing against Kunal Kamra and Sushma Andhare to March 10 as complainant Pravin Darekar remained absent.
























































