कल्याणच्या पार्किंगमधील आगीचे गौडबंगाल काय?, लाल चौकीत पुन्हा भडका; 12 गाड्या जळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डोंबिवलीतील राज अपार्टमेंट इमारतीच्या पार्किंगमध्ये 29 दुचाकी जळून खाक झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा पहाटेच्या सुमारास कल्याण पश्चिमेतील लाल चौकी परिसरात अग्नितांडव उसळला. या आगीत रॉयल रेसिडेन्सी या इमारतीच्या ओपन पार्किंगमधील 12 गाड्या जळून खाक झाल्या. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र तीन दिवसांतील या दुसऱ्या घटनेचे नेमके गौडबंगाल काय, असा सवाल विचारला जात आहे.

कल्याणच्या लाल चौकी परिसरातील ‘रॉयल रेसिडेन्सी’ इमारत आहे. या इमारतीच्या आवारात रहिवाशांनी वाहने पार्क करून ठेवली होती. मात्र आज पहाटे चारच्या सुमारास ओपन पार्किंगमधून अचानक धूर येऊ लागला. काही क्षणातच एकापाठोपाठ एक अशा 12 गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी आल्या.

दोन दिवसांची पोलीस कोठडी

डोंबिवलीच्या राज अपार्टमेंट सोसायटीमध्ये लागलेल्या आगीच्या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे. लवेश पार्टे असे अटक आरोपीचे नाव आहे. मानपाडा पोलिसांनी इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक व्यक्ती संशयास्पद आढळून आला. याच इमारतीत राहणारा लवेश हा पहाटे घरातून काही तरी वस्तू घेऊन खाली उतरला. त्याने ती वस्तू पार्किंगमधील कचरा पेटीत टाकली आणि काही क्षणातच कचरा पेटीने पेट घेतला. या आगीत 29 दुचाकी जळाल्या. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.