
इराणचा अणुकार्यक्रम थांबवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आता दबावाचे राजकारण सुरू केले आहे. इराणशी वाटाघाटी सुरू असतानाच मध्य आशियात लष्करी जमवाजमव सुरू झाली असून गेल्या अवघ्या 24 तासांत अमेरिकेची 50 लढाऊ विमाने इराणच्या दिशेने झेपावली आहेत. त्यामुळे जगावर आणखी एका युद्धाचे ढग दाटले आहेत.
इराणला अण्वस्त्र संपन्न राष्ट्र बनण्यापासून रोखणे हा अमेरिकेचा अजेंडा आहे. इराणचा अण्वस्त्र विकासाचा कार्यक्रम जगासाठी धोका आहे असा अमेरिकेचा दावा आहे. त्यासाठी इस्रायलला हाताशी धरून अमेरिकेने काही महिन्यांपूर्वी इराणवर हल्ला केला होता. त्यावेळी इराणी अणुभट्टय़ांना लक्ष्य करण्यात आले. इराणनेही इस्रायल आणि अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी युद्धबंदी करण्यात आली. मात्र, त्यानंतर इराणने पुन्हा अणु कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. अलीकडेच इराणमध्ये झालेल्या सरकारविरोधी आंदोलनात अमेरिकेचा हात असल्याचे बोलले जात होते. सध्या जीनिव्हा येथे दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये वाटाघाटी सुरू आहेत. इराणने अणुकार्यक्रम थांबवावा. त्या बदल्यात इराणवरील आर्थिक निर्बंध उठवण्याचे संकेत अमेरिकेने दिले आहेत. मात्र, या वाटाघाटी खूपच संथपणे सुरू असल्यामुळे अमेरिका लष्करी दबाव वाढवत असल्याचे समजते.
कोणत्याही क्षणी युद्धाचा भडका
लढाऊ विमाने पाठवण्याआधीच अमेरिकेने मध्य आशियाच्या समुद्रात नौदलाची दोन जहाजे सज्ज ठेवली आहेत. या जहाजांवर तीन मिसाइल डिस्ट्रॉयरही तैनात करण्यात आले आहेत. यूएसएस अब्राहम लिंकन व काही विमाने आधीपासूनच तिथे तैनात आहेत. त्यामुळे इराणवर कोणत्याही क्षणी हल्ला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



























































