
मल्लांच्या घामाला आणि जिद्दीला न्याय देणारी मानाची 68वी ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा यंदा पुण्यातील वाघोलीत 18 ते 22 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने राज्य कुस्तीगीर संघटनेने रणशिंग फुंकले असून माती आणि गादी विभागात होणाऱया या स्पर्धेसाठी मराठमोळ्या मल्लांनी तयारीला लागण्याचे आव्हान आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या स्पर्धेत चार गट पाडण्यात आले आहेत. गादी आणि माती प्रकारात होणाऱया या स्पर्धेत ‘अ’ गटात 57 कि., 86 कि. व महाराष्ट्र केसरी गट, ‘ब’ गटात 61 कि., 79 कि., ‘क’ गटात 65 कि., 74 कि. आणि 92 कि. तसेच ‘ड’ गटात 70 कि. आणि 97 कि. वजनी गटात होणार आहे. अंतिम फेरी आणि ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाची मुख्य लढत दि. 22 मार्च रोजी होणार आहे.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सरचिटणीस योगेश दोडके, कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, मुख्य आयोजक रामकृष्ण सातव-पाटील आणि राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष तात्यासाहेब भिंताडे विशेष परिश्रम घेत आहेत.
840 मल्लांचा महासंग्राम!
राज्यातील तब्बल 42 जिल्हे व शहर संघांतील सुमारे 840 मल्ल या स्पर्धेत ताकद आजमावणार आहेत. गादी आणि माती विभागात रंगणाऱया या लढतींसाठी 100 तांत्रिक अधिकारी, 84 संघव्यवस्थापक आणि 84 मार्गदर्शक हजर राहणार आहेत. पारदर्शकता आणि शिस्त यावर आयोजकांनी ठाम भूमिका घेतली आहे. ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाच्या विजेत्याला तब्बल 1 किलो चांदीची गदा आणि भव्य रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक मल्लाच्या डोळ्यांत गदेचे स्वप्न आणि छातीत जिद्दीची ज्वाला पेटलेली असेल. त्यामुळे तमाम कुस्ती शौकिनांसाठी ही ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा म्हणजे एक पर्वणीच असेल.
























































