क्रिकेट सामना सुरू असताना मधमाशांचा हल्ला, अंपायरचा मृत्यू तर खेळाडू जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रिकेटवेड्या हिंदुस्थानात दररोज कुठे ना कुठे क्रिकेट स्पर्धा सुरू असता. भर उन्हात तरुणांसह वयस्कर मंडळी सुद्धा क्रिकेट खेळण्यासह बघण्याचा आनंद घेतात. मात्र, मागील काही महिन्यांमध्ये चालू सामन्यात हृदयविकाराच्या झटक्याने खेळाडूंचे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे खेळाडूंमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशातच उत्तर प्रदेशात सामना सुरू असताना मधमाशांनी हल्ला केल्यामुळे 52 वर्षांच्या अंपायरचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उन्नाव येथील सप्रू मैदानावर बुधवारी (18 फेब्रुवारी) YMCC आणि पॅरामाउंट या संघामध्ये सामना खेळला जात होता. सामन्याच्या दुसऱ्या डावात ड्रिंक ब्रेक दरम्यान मधमाशांनी अचानक मैदानावरील खेळाडूंवर हल्ला केला. मधमाशांनी हल्ला केल्यामुळे सर्व खेळाडू मैदानात झोपून राहिले. मात्र, मधमाशा खेळाडूंसह अंपायरवर तुटून पडल्या होत्या. मधमाशांच्या या हल्ल्यात अनेक खेळाडू जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यामध्ये 52 वर्षीय मानिक गुप्ता यांच्यावरही मधमाशांनी जबर हल्ला केला. त्यांनाही रुग्णालयात घेऊन जाण्यात येत होतं मात्र, वाटेतच त्यांची प्राणज्योत मावळली. पांढरे कपडे घातल्यामुळे जवळपास 10 मिनिटे मधमाशांनी त्यांना घेरल्याचं बोललं जात आहे. मानिक गुप्ता यांच्या शरीरावर 50 हून अधिक दंश झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.