जाऊ शब्दांच्या गावा – मांजराच्या गळ्यात…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> साधना गोरे

रानटी अवस्थेतल्या माणसाचा कळप ते समाज असा प्रवास झाला. या प्रवासात त्याने काही प्राण्यांनाही माणसाळवलं. त्यातलाच एक प्राणी म्हणजे मांजर. मांजर घरातले उंदीर खाऊन मनुष्याला मदत करतं; पण गाय, म्हैस, शेळी, मेंढी, कुत्रा, घोडा इत्यादी प्राण्यांप्रमाणे माणसाला त्याचा तसा थेट उपयोग होत नाही. ‘वाघाची मावशी’ म्हणून ओळखला जाणारा हा प्राणी जात्याच मांसाहारी आहे.

संस्पृतमधील ‘मार्जार’ शब्दापासून मराठीत ‘मांजर’ शब्द आला असं म्हटलं जातं. संस्पृतमध्ये ‘मार्ज’, ‘मृज्’ म्हणजे धुणे. ‘सडासंमार्जन’ हा शब्दही ‘झाडलोट करून स्वच्छ करणं’ या अर्थाने वापरला जातो. मराठीतील ‘मांजर’ शब्दाशी साधर्म्य असणारे शब्द इतर भारतीय भाषांमध्ये आढळत नाहीत. हिंदी व पंजाबीमध्ये ‘बिल्ली’, गुजरातीमध्ये ‘बिलाडी’, बंगालीमध्ये ‘बिराल’ असे शब्द आहेत. उत्तरेकडील भोजपुरी, अवधी या भाषांमध्येही बिल्लीशी मिळतीजुळती रूपं आहेत. संस्पृतमधील ‘बिल’पासून हे शब्द विकसित झाल्याचं म्हटलं जातं. पालीमध्येही नर मांजराला ‘बिळार’ आणि मादी मांजराला ‘बिळाली’ असे शब्द आहेत. मग फक्त मराठीतच ‘मांजर’ शब्द कुठून आला? कृ. पां. कुलकर्णी म्हणतात, ‘मांजर’ शब्दाच्या व्युत्पत्तीविषयी बराच घोटाळा आहे. मांजर हे तोंडावरून पंजा फिरवून तोंड धुण्यासारखी काही क्रिया करते म्हणून ‘मार्ज्’, ‘मृज्’ हा धातू मूळ असावा असे म्हणतात. ‘मार्जार’ शब्दाचा अर्थ ‘मोर’ असा आहे. ‘मांजर’ या अर्थी वेदांत तो शब्द नाही. त्यावरून हा प्राणी प्राचीन आर्यांच्या परिचयाचा नसावा. हिंदुस्थानांत आल्यानंतर हा प्राणी दिसला असावा व शब्दही त्याच वेळी संस्पृतमध्ये आला असावा. ‘मज्जर’ असा एक ऑस्ट्रोएशियाटिक भाषांत शब्द आहे. ‘उन्दर’, ‘इन्दुर’ वगैरे ऑस्ट्रोएशियाटिक शब्द जसे वेदोत्तर संस्पृतमध्ये घेतले गेले, तसा हाही घेतला गेला असला पाहिजे.

पाली भाषेत नर मांजराला म्हणजे बोक्याला ‘मज्जार’ आणि मादी मांजराला ‘मज्जारी’ असे शब्द आहेत, हेही इथं लक्षात घेतलं पाहिजे. अनेक देशांत आणि संस्पृतींमध्ये मांजराविषयी शुभाशुभ समजुती आहेत. आपल्याकडे एखाद्या शुभ कार्याला जाताना मांजर आडवं गेलं तर कामात अडथळा येणार किंवा ते होणार नाही, अशी समजूत आहे, पण दुसरीकडे मांजर मारणं हे पाप समजलं जातं. त्यातून मुक्त होण्यासाठी काशीला जाऊन सोन्याचं मांजर द्यावं लागतं, अशीही समाजमान्यता आहे. यावरून एखाद्या गोष्टीतून कुणाला वगळल्यास ‘‘त्याने काय मांजर मारलं काय?’’ असं म्हटलं जातं.

मांजराच्या दिसण्यावरून, त्याच्या सवयींवरून काही शब्दप्रयोग रूढ झालेले दिसतात. घारे डोळे असणाऱया व्यक्तीला ‘मांजरडोळे’ म्हटलं जातं. रात्र होण्यापूर्वी आणि संध्याकाळपेक्षा थोडय़ा जास्तीच्या काळोखाला ‘मांजरझाक’ म्हणतात, कारण अशा वेळी मांजर दिसत नाही. मांजर हे चित्ता, वाघ यांच्या पुळातील असल्याने आपल्याकडे त्याला ‘वाघाची मावशी’ म्हणण्याची पद्धत आहे, पण या मांजरालाही मावशी आहे. ती कोण माहितीये? चिचुंद्री. कारण मांजर तिला मारत नाही. एक प्रसिद्ध म्हण म्हणजे ‘मांजर अगदी डोळे मिटून दूध पितं’. आपल्याकडून चूक घडलेल्या मनुष्याला वाटतं की, त्याबद्दल कोणाला माहीत नाही, पण लोक सगळं जाणून असतात. अशा स्थितीत ही म्हण वापरली जाते.

मांजर हा प्राणी अत्यंत स्वच्छताप्रिय आहे. त्यामुळे ते स्वतःचं शरीर सतत चाटूनपुसून स्वच्छ करत असतं. शिवाय विष्ठा केल्यावर त्यावरही माती लोटतं. यावरून आपली वाईट पृत्ये लपवून ठेवणाऱ्या व्यक्तीला उद्देशून ‘मांजर गू लिपते’ असं म्हटलं जातं. पिल्लांच्या जन्मानंतर मांजर त्यांना चाटूनपुसून स्वच्छ करते. शिवाय स्वतःच्या शरीरातून बाहेर आलेली वारही ती खाते. तिचं एखादं पिल्लू जन्मतः अशक्त असेल तर ती त्यालाही खाते, असं निरीक्षण काही प्राणी अभ्यासकांनी नोंदवलेलं आहे. यावरून ‘मांजर आपल्या पिलास खाते, ते उंदरास कसं सोडील?’ अशी म्हण आहे. ‘आपल्या माणसांना त्रास देणारी व्यक्ती शत्रूवर दया करेल ही अपेक्षाच व्यर्थ आहे’, या अर्थानं ही म्हण वापरली जाते. आपल्या पिल्लांना सुरक्षित स्थळी नेणाऱया मांजरीला तुम्ही पाहिलं असेल तर ‘मांजरीचे दात तिच्या पिलास खात नाहीत’ किंवा ‘मांजरीचे उंदराला धरायचे दात वेगळे व पिल्लास धरण्याचे दात वेगळे’ या म्हणींचा अर्थ तुम्हाला लगेच उलगडेल. पाळीव मांजराच्या मालकाला त्याच्या गळ्यात घंटा बांधणं म्हणजे हातचा मळ. तरी ‘मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधावी?’ अशी म्हण सर्रास वापरली जाते. कारण ती म्हण उंदरांसाठी आहे ना! आपले हितसंबंध जोपासणाऱ्या व्यक्तींना उद्देशून वापरली जाणारी ‘मांजराला उंदीर साक्ष’ ही म्हणही सर्वश्रुत आहे.